पंढरपूर, दि.21 – महसूल विभागाने जप्त केलेल्या 146 ब्रास वाळूचा लिलाव सोमवार 21 डिसेंबर रोजी पंढरपूरच्या प्रांत कार्यालयात ठेवण्यात आला होता. यासाठी 5 लाख 40 हजार रूपये किंमत ठेवण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात बोली लावताना तीनपट किंमत या वाळूला आली असून 18 लाख 70 हजार रूपयांना विक्री झाली असून प्रतिब्रास 15 हजार रूपये किंमत आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पंढरपूर भागात वाळू चोरीच्या घटना घडत असून महसूल व पोलीस विभाग कारवाई सतत करत असते. यात मिळून आलेल्या वाळूचे लिलाव येथे केले जातात. याच अंतर्गत आज सोमवारी 146 ब्रास वाळूचा लिलाव ठेवण्यात आला होता. याची अपसेट रक्कम ही 5 लाख 40 हजार रूपये गृहित धरण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात जेंव्हा वाळूचा लिलाव झाला तेंव्हा बोली तीनपटहून अधिक मिळाली आहे. 18 लाख 70 हजार रूपयांचा महसूल यातून शासनाला मिळाला आहे. यासाठी 18 जीएसटी व दहा टक्के मायनर मायनिंग चार्जही बोली लावणार्यांना भरावे लागतात. दरम्यान आजवर येथील वाळूला नेहमीच चांगला दर मिळत आहे पण 15 हजार रूपये ब्रासला मिळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.