क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता महिला शिक्षण दिन म्हणून साजरा होणार
मुंबई, दि. 23 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस दिनांक तीन जानेवारी हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत भाषणे, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे, सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयात, शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.
त्यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल. ऑनलाईन तसेच ऑफलाईन चर्चासत्र आयोजित केले जातील आणि समाजमाध्यमांवर मी सावित्री, महिला शिक्षण दिन असे हॅशटॅग वापरून नव्या पिढीला यात सामावून घेतले जाईल. अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.
‘सावित्रीजोती’ मालिका सुरु राहण्यासाठी अर्थसहाय्याची मागणी
मुंबई, दि. 23 :- महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत सोनी मराठी वाहिनीवर सुरु असलेली ‘सावित्रीजोती’ मालिका बंद करण्यात येत असून महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने या मालिकेसाठी अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात श्री.भुजबळ म्हणाले, महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत दशमी निर्मिती संस्था यांची निर्मिती असलेली ‘सावित्रीजोती’ ही मालिका सोनी मराठी या वाहिनीवर प्रदर्शीत होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवन व समाजकार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत या मालिकेद्वारे पोहचविले जात आहे. मालिकेचे अद्याप १०० भाग प्रदर्शित होण्याचे बाकी आहेत, असेही श्री.भुजबळ यांनी सांगितले.
महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या सामाजिक सुधारणेच्या कालखंडाबाबतचे भाग प्रदर्शित होणे बाकी आहे. या महापुरुषांच्या जीवनावरील माहितीपूर्ण भाग प्रेक्षकांपर्यंत पोहचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या मालिकेसाठी राज्य शासनामार्फत अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी श्री.भुजबळ यांनी केली आहे.