पंढरपूर, दि. 02 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पंढरपूर तालुक्यात 72 ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून, निवडणूकीसाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 साठी तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीसाठी 1 लाख 9 हजार 194 पुरुष मतदार व 96 हजार 206 स्त्री मतदार तसेच इतर 01 असे एकूण 2 लाख 5 हजार 401 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी 72 ग्रामपंचायतीसाठी 279 प्रभाग तर यासाठी एकूण सदस्य संख्या 776 आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 50 निवडणुक निर्णय अधिकारी तसेच 1 हजार 380 कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार विवेक सांळुखे, निवडणुक नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे, महसूल सहाय्यक श्री. एस.बी.कदम यांच्यासह इतर कर्मचारी पुढाकार घेत असल्याचे उपविभागीय अधिकारी ढोले यांनी सांगितले.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 साठी तालुक्यातील 72 ग्रामपंचायती निवडणूकीसाठी 3 हजार 333 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत 33 अर्ज अपात्र झाले आहेत. दि. 4 जानेवारी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजनी होणार असल्याचेही श्री.ढोले यांनी सांगितले