पंढरपूर – सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. येथे रूग्णसंख्येत पंढरपूर तालुका आघाडीवर असून येथे सर्वाधिक 7 हजार 857 कोरोनाबाधित आजवर आढळून आले आहेत. तर सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक मृत्यूही याच तालुक्यात 231 नोंदले गेले आहेत. रविवार 3 जानेवारी रोजी पंढरपूर शहरात 7 तर ग्रामीणमध्ये 7 अशा चौदा रूग्णांची यात भर पडली आहे.
जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत येथे कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव पाहावयास मिळाला आहे. येथे जरी रूग्ण जास्त आढळून आले असले तरी येथील रिकव्हरी रेट मोठा आहे. सध्या केवळ 108 जणांवर उपचार सुरू आहेत तर 7518 जण उपचारानंतर घरी परतले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पंढरपूर पाठोपाठ माळशिरस तालुक्यात 6934 तर बार्शीत 6662 रूग्ण आढळून आले आहेत. माढा तालुक्यात 4050 जणांना या आजाराची लागण झाली होती.
रविवार 3 जानेवारी रोजी आलेल्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीण भागात 43 कोरोनाबाधितांची भर असून सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 14 आढळून आले आहेत. पंढरपूर शहरात आजवर 3297 तर ग्रामीणमध्ये 4560 जणांना कोरोनाची लागण झाली होती. शहरातील 96 तर ग्रामीणमधील 135 जणांना या आजारात प्राण गमावावे लागले आहेत. सध्या शहरातील 43 तर तालुक्यातील 63 जणांवर उपचार सुरू आहेत.