पंढरपूर – लॉकडाऊननंतर पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर 16 नोव्हेंबर 2020 पासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून आतापर्यंत अडीच महिन्याच्या कालावधीत 1 लाख 56 हजार भाविकांना श्रींचे मुखदर्शन घेता आले आहे. 30 जानेवारी 2021 पर्यंत मंदिरे समितीला 1 कोटी 81 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 या कालावधीत श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शासनाने मंदिर उघडण्यास परवानगी दिली मात्र यासाठी आरोग्यविषयक नियम पाळण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच श्रींचे मुखदर्शन या कालावधीत मिळत आहे. पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. दर्शन सुरू करताना ऑनलाइन बुकींगची अट होती मात्र 20 जानेवारी पासून ती रद्द करण्यात आली आहे. मागील अडीच महिन्यात श्री विठ्ठल रूक्मिणीच्या मुखदर्शनाचा लाभ राज्यातील 1 लाख 56 हजार भाविकांनी घेतला आहे तर 20 जानेवारीपासून ऑनलाइन दर्शन पासची अट रद्द झाल्यानंतर 77 हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे.
दरम्यान राज्यभरात श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या 2355 एकर जमिनी असून यापैकी 1021 जमीन समितीने ताब्यात घेतली आहे. लॉकडाऊन काळात 113 एकर जमिनीवर समितीची नावे लागली आहेत. मंदिरे समितीने 102.6 हेक्टर क्षेत्र शेतकर्यांना खंडाने कसण्यास दिले असून यातून 11 लाख 56 हजार रूपये उत्पन्न मिळाले आहे. जमिनींबाबत न्यायालयात 64 प्रकरणे असून यापैकी आठ निकाल मंदिरे समितीच्या बाजूने लागले आहेत. तर उर्वरित 56 प्रकरणांसाठी स्वतंत्र विधिज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. अशी माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.