प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या पंढरपूर प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या सूचना
पंढरपूर, दि. 02 :- जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून चाचण्याचे प्रमाण वाढवा अशा सूचना प्रभारी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
कोरोना आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस तहसिलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, किरण अवचर, प्रशांत भस्मे यांच्यासह शासकीय व खासगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी गुरव बोलताना म्हणाले, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय समिती तसेच शहरी भागातील वार्डस्तरीय समितीने विशेष मोहीम राबवून रुग्णांचा शोध घ्यावा तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून तत्काळ तपासणी करुन उपचार सुरु करावेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग किमान 20 पेक्षा जास्त व्हायला हवे. तसेच खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती घ्यावी घेवून त्यामध्ये काही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ तपासणी करावी. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी. तसेच या रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत रुग्णासाठी बेड उपलब्ध ठेवावेत. विनामास्क फिरणा-या नागरिकांवर प्रभावीपणे कारवाई करावी अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी दिल्या.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व शासनाच्या नियमांचे पालन करावे. जे नागरिक नियमांचे उल्लघंन करतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे तहसिलदार सुशील बेल्हेकर यांनी सांगितले. शहरासह ग्रामीणभागात कोरोना संसर्ग वाढत असल्याने ग्रामीण भागात रुग्णांचा शोध घेण्यासाठी ग्रामस्तरीय समितीमार्फत विशेष शोध मोहिम राबविण्यात येणार असून, आवश्यक ठिकाणी चाचणी केंद्रही सुरु करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके यांनी सांगितले.
तालुक्यात शहरी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढुनये यासाठी स्ट्रेसिंग, टेस्टींग उपचार यावर भर देण्यात येणार आहे.तसेच घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार असून नागरिकांनी कोणताही आजार लपवू नये घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला खरी माहिती द्या जेणेकरुन लक्षणे असणाऱ्या नागरिकांवर तात्काळ उपचार करता येतील. तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बोधले यांनी सांगितले.
कोरोनाबाबत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपये दंड, सामाजिक अंतराचे पालन न केल्यास 100 रुपये दंड व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
65 एकर येथील कोविड केअर सेंटरची
प्रांताधिकारी यांनी केली पाहणी
पंढरपूर, दि. 02 :- तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या 65 एकर येथील कोविड केअर सेंटरच्या सुविधांची प्रभारी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी भेट देवून पाहणी केली.
कोविड केअर सेंटर येथे रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती प्रांताधिकारी गुरव यांनी घेतली तसेच. तेथील डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी यांच्याशी आवश्यक सुविधा, औषध साठा आदी बाबत माहिती घेवून संवाद साधला. तसेच दाखल कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून शंकाचे निरसन केले. तसेच रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधेबाबत समाधान व्यक्त केले.