पंढरपुर – मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांना वरदान ठरणारी उपसा सिंचन योजना गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहे. त्याबाबत आपण स्वत: जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना सूचना करू व ते काम मार्गी लावू , असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांना दिले आहे.
दुष्काळी 35 गावातील शेतकऱ्याच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी आतिषय महत्वाची समजली जाणारी 2 टीएमसी पाणी व 530 कोटींच्या या उपसा सिंचन योजनेला सन 2014 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा, उपोषण, आंदोलन करूनही ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडली आहे. आता सुरू सलेल्या अधिवेशनात तरी किमान या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, त्यासाठी निधीची तरतूद करावी व प्रत्यक्ष कामाला तत्काळ सुरुवात करावी. यासाठी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची मुंबई येथील सिल्व्हरओक निवासस्थानी भेट घेऊन मागणी केली आहे. शिवाय या मतदारसंघात आता पोट निवडणूक होणार आहे. त्याची आचारसंहिता केव्हाही लागू शकते त्या आगोदर प्रशासकीय मान्यता देऊन दुष्काळी 35 गावातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आशी मागणी शैला गोडसे केली आहे.
यावेळी शैला गोडसे यांनी दिवंगत आ. भारत भालके यांच्या निधनानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उपसा सिंचन योजना मार्गी लावणे हीच खरी स्व. भारत नानांना श्रद्धांजली ठरेल असे वक्तव्य केले होते. याचीही आठवण करून दिली.
त्यावर खा. शरद पवार यांनी या योजनेबाबत विधमान सरकार सकारात्मक आहे. सध्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आजारी असल्याने कामकाजात सहभागी होत नाहीत. ते येत्या काही दिवसात अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात संसदीय कामकाजात सहभागी होतील त्यावेळी आपण स्वता या योजनेबाबत त्यांच्याशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यासठी सूचना करू, शिवाय आताच्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यासठी ही प्रयत्नशील असल्याचे खा. शरद पवार यांनी संगितले आहे.
येत्या काही दिवसांमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिवंगत आ. भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक होत आहे. शिवसेना नेत्या शैला गोडसे ही या जागेवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी आता उपसासिंचन योजना, पाणी, प्रश्नावर थेट खा शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.