सोलापूर – राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना वाढत असून सोलापूर जिल्ह्यातील रूग्णसंख्या पाहता जिल्हा ग्रामीणमध्ये आता सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळेतच सुरू राहणार आहेत. यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळही सकाळी सात ते सायंकाळी या वेळेतच उघडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून सर्व आठवडी व जनावरांचे बाजार बंद करण्याच्या सूचना आहेत.
राज्यात 31 मार्चपर्यंत शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आलेलाच असून यातील प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेतच. जिल्ह्यात ( सोलापूर पोलीस आयुक्तालयाची हद्द सोडून ) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यांच्या अधिकारात फौजदारी दंडसंहिता 1973 चे कलम 144 नुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व कोरोना रूग्ण संख्येवर आळा घालण्याच्या उपाय योजना करण्यासाठी 25 मार्च 2021 रोजी पुढील आदेश होईपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत व ते आज 25 मार्चपासूनच लागू झाले असून कोरोनाची पुढील परिस्थिती पाहून या आदेशाला 31 मार्चनंतर मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला जावू शकतो.
जिल्ह्यात ( सोलापूर पोलीस आयुक्तालयाची हद्द सोडून) प्रत्येक शनिवार व रविवारी सर्व दुकाने बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वस्तू, भाजीपाला, दूध, किराणा, वृत्तपत्र वितरण यांना यातून वगळण्यात आले आहे. जिल्ह्यातील हॉटेल्स, परमिट रूम बिअर बार हे सकाळी सात सायंकाळी आठ यावेळेत पन्नास टक्के आसनक्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून होम डिलिव्हरीसाठी किचन 10 वाजेपर्यंत खुली ठेवली जावू शकतात.
जिल्ह्यात जीम, जलतरण तलाव, मैदान ही वैयक्तिक सरावासाठी सुरू ठेवता येवू शकतात मात्र याकाळात सामुहिक स्पर्धा व कार्यक्रम करता येणार नाहीत. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे ही सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळेत भाविकांसाठी खुली राहतील तर धार्मिक विधींसाठी पाच जणांना परवानगी देण्यात आली आहे. याच बरोबर बाजार समित्यांमध्ये एकाचवेळी लिलाव न करता वेळा विभागून देण्याच्या सूचना सहकारी संस्था उपनिबंधकांना देण्यात आल्या आहेत. तसेच बाजार समिती आवारात किरकोळ विक्रीस मज्जाव करण्यात आला आहे.
कंटेंनमेंट झोनमध्ये सर्व दुकाने , धार्मिकस्थळे, आस्थापन, कार्यालय बंद करण्याचे आदेश असून अत्यावश्यक सेवा या ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे देण्याची सूचना करण्यात आली आहे.