पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : 2009 नंतर आता 2021 मध्येच थेट चुरशीचा दुरंगी सामना रंगणार
पंढरपूर – पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत यंदा राष्ट्रवादी काँगे्रस व भारतीय जनता पक्षात सरळ लढत होत असल्याने काटे की टक्कर पाहावयास मिळणार आहे. आमदार कै. भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांच्यासमोर भाजपाचे समाधान आवताडे यांचे जबर आव्हानं असणार आहे. या दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार अगोदरपासून सुरू केला आहे. या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर प्रथम 2009 मध्ये राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील व रिडालोस प्रणित स्वाभिमानी पक्षाचे भारत भालके यांच्यात सरळ दुरंगी चुरशीचा सामना झाला होता. यात भालकेंची सरशी झाली होती. आता 2021 पोटनिवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीत दुरंगी लढत होत आहे.
2014 व 2019 च्या लढती तिरंगी झाल्या होत्या. यात आमदार भारत भालके, परिचारक व आवताडे या तीन उमेदवारांमध्ये चुरस असायची. या दोन निवडणुकांमध्ये चिवट झुंज दिलेल्या आवताडे यांना उमेदवारी देत भाजपाने आमदार प्रशांत परिचारक गटाला समजावून सांगण्यात यश मिळविले आहे. यामुळे ही यंदाची लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि रंगतदार होणार हे निश्चित आहे. मुळात पोटनिवडणुकांमध्ये इतकी चुरस कधी निर्माण होताना दिसलेली नाही. मात्र येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला व प्रचाराला सुरूवात केली आहे तर दुसरीकडे शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली व मतदारभेटीवर भर दिला आहे. यामुळे निवडणुकीत अनेक उमेदवार असणार हे आता निश्चित आहे.
आमदार कै. भारत भालके यांनी तीन निवडणुका जिंकल्या मात्र वेगवेगळे पक्ष त्यांनी निवडले होते. 2019 ला ते राष्ट्रवादीकडून लढून विजयी झाले होते. आता त्यांचे सुपुत्र भगिरथ यांना पक्षाने येथून उमेदवारी देवू केली आहे. 30 मार्च मंगळवारी दोन्ही दिग्गज उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. आवताडेंसाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासारखे दिग्गज येथे हजेरी लावत आहेत तर भालकेंचा अर्ज दाखल होताना उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येत आहेत. यामुळे मंगळवारी पंढरपूर मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
भालके यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती मात्र भाजपाकडून समाधान आवताडे यांना संधी दिली गेल्याने लढत अत्यंत चुरशीची बनली आहे. परिचारक व आवताडे गट एकत्रित येत असल्याने ताकद वाढणार आहे. हे पाहता आता राष्ट्रवादीला येथे जास्त लक्ष केंंद्रित करावे लागणार असे दिसत आहे.
आवताडेंच्या मतांचा उंचावता आलेख
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मागील 2014 व 2019 या दोन विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर येथे तिरंगी लढती झाल्या. यात समाधान आवताडे यांनी तिसर्या क्रमांकाची मते मिळविली असली तरी 2014 च्या तुलनेत 2019 ला त्यांच्या मतांमध्ये जवळपास पाच टक्के मतं वाढली आहेत. तर पहिल्या दोन उमेदवारांच्या मतांची टक्केवारी कमी झाल्याचे दिसून येते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे मंगळवेढा तालुक्यात क्रमांक एकवर राहिले व त्यांनी एकूण 54 हजार 124 मतं मिळविली आहेत. त्यांना पंढरपूर भागात मतदान कमी मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2019 च्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांना 89 हजसा 787 मते मिळाली होती याची टक्केवारी 37.48 इतकी होते तर भाजपाचे सुधाकरपंत परिचारक यांना 76426 मते मिळाली होती. ही टक्केवारी 31.90 इतकी होते. अपक्ष समाधान आवताडे यांनी 54 हजार 124 मते घेतली व त्यांची मत टक्केवारी 22.59 टक्के इतकी होते. ( 2019 च्या निवडणुकीत एकूण मतदान 2 लाख 39 हजार 691 म्हणजे 71.74 टक्के इतके झाले होते.)
2014 ला तत्कालीन काँग्रेस उमेदवार भारत भालके यांना 91 हजार 863 मते मिळाली होती. याची टक्केवारी 40.03 इतकी होते. दुसर्या क्रमांकावर राहिलेले महायुतीचे उमेदवार प्रशांत परिचारक यांना 82 हजार 950 मतं मिळाली होती याची टक्केवारी 36.15 होते. तर शिवसेनेकडून उभे राहिलेल्या समाधान आवताडे यांना 40 हजार 910 मतं मिळाली होती तर याची टक्केवारी 17.83 टक्के होती.( 2014 च्या निवडणुकीत एकूण मतदान 2 लाख 29 हजार 492 इतके झाले होते. याची एकूण टक्केवारी 75.46 टक्के होती.)
यामुळे दोन निवडणुकांचा तिरंगी लढतीचा विचार केला तर दोन्ही वेळा आमदार राहिलेले भारत भालके व परिचारक यांच्या मतांची टक्केवारी कमी होताना दिसते. भालके यांना 2014 ला 40 टक्क्याहून अधिक मते होती तर 2019 ला 37.48 टक्के तर परिचारक यांना 2014 ला 36.15 तर 20169 ला 31.90 टक्के मते मिळाली आहे. समाधान आवताडे यांना मात्र 2014 ला 17.83 तर 2019 ला 22.59 टक्के मते मिळाली होती.