पंढरपूर – ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर येथे विठ्ठल परिवार व स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात निर्माण झालेले गैरसमजाचे वातावरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने निवळले असून आता सार्यांनी पक्षाचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार कै. भारत भालके यांच्या निधनानंतर येथील राष्ट्रवादी व विठ्ठल परिवारात थोड्या कुरबुरी निर्माण झाल्या होत्या. पक्षाचा तालुकाध्यक्ष बदलल्याने यात आणखीच भर पडली. मावळते अध्यक्ष दीपक पवार यांच्यावर विश्वास दाखवत अनेकांनी नवा तालुकाध्यक्ष निवडीला विरोध केला.याच दरम्यान विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील कारखान्याची निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनीच कारखाना अध्यक्षपदाच्या निवडीवेळीही अध्यक्षपदावर दावा सांगितला होता.
येथील पक्षातील व विठ्ठल परिवारातील वाद श्रेष्ठींपर्यंत पोहोचला. मंगळवारी जयंत पाटील हे भगिरथ भालके यांचा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंढरपूरला आले असता त्यांनी विठ्ठल हॉस्पिटलमध्ये बैठक घेवून त्यांनी भालके, दीपक पवार, युवराज पाटील , युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्याशी चर्चा केली व मतभेद मिटवून विधानसभा पोटनिवडणुकीत एकदिलाने काम करण्यास सांगितले.