पंढरपूर– पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेच्या जिल्हा संघटक शैला धनंजय गोडसे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आल्याची माहिती पक्षाचे मुखपत्र सामनामधून देण्यात आली आहे.
शैला गोडसे या शिवसेनेच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांपैकी एक असून त्यांनी पंढरपूर विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी 2019 मध्ये देखील केली होती. मात्र त्यांना महायुतीत ही जागा भाजपाला गेल्याने थांबावे लागले होते. मात्र आता पोटनिवडणुकीत त्यांनी जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेत असतानाच त्यांनी दोन्ही तालुक्यात संपर्क कार्यालय उभारली आहेत. यानंतर आता अपक्ष उमेदवारी दाखल करून शक्तीप्रदर्शन ही घडविले होते.
दरम्यान पंढरपूरची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडे असल्याने येथून पक्षाने आमदार कै. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी देवू केली आहे. कालच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवून भाजपाला पराभूत करेल असा विश्वास व्यक्त केला होता तर भगीरथ भालके यांनीही मित्रपक्षातील अर्ज दाखल केलेल्यांची आम्ही समजूत काढू असे स्पष्ट केले होते. महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारया शिवसेनेला शैला गोडसे यांनी भरलेला अपक्ष अर्ज रूचलेला नसून पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार गोडसे यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सामनामधून कळविण्यात आले आहे.
दरम्यान गोडसे यांनी आपली उमेदवारी जनतेच्या पाठिंब्याने असल्याने आपण या निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे अर्ज दाखल करतानाच स्पष्ट केले होते. दरम्यान त्यांची उमेदवारी आता कायम राहणार हे निश्चित असून यामुळे देखील चुरस निर्माण होणार आहे. महिला वर्गातून गोडसे यांना चांगले समर्थन मिळत असल्याचे दिसत आहे.