पंढरपूर – मी शिवसेनेवर नाराज नाही , मला पक्षाने भरभरून दिले आहे. फक्त निवडणूक लढवण्याची संधी मिळावी म्हणून मी पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये अर्ज दाखल केला आहे. सध्या शिवसेना पक्ष हा महाविकास आघाडी सोबत असून या आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार पंढरपूरमध्ये दिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून मला पक्षातून काढून टाकणे अपेक्षित होते. किंबहुना पक्षाला माझ्यामुळे अडचण होऊ नये म्हणून मी स्वतः जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली होती, असे पंढरपूर निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केल्याने शिवसेनेतून बुधवारी काढून टाकण्यात आलेल्या शैला गोडसे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या ,शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून दिनांक 31 मार्च 20 21 रोजी प्रसिद्ध झाल्या प्रमाणे पक्ष विरोधी कार्यवाही केल्याने मला पक्षातून व पदावरून काढून टाकण्यात आल्याची कारवाई केल्याचे दिसून आले व पक्षप्रमुखांनी सदरची कारवाई करणे अपेक्षित होते. सदर कारवाई जनतेसाठी मी कठोर अंतःकरणाने स्वीकारलेली आहे. शिवसेना पक्षाने सोलापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी देऊन मला जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी बळ दिले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पक्षातील ज्येष्ठ नेते व शिवसैनिकांच्या जोरावर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न मंत्रालय स्तरावर सोडवण्याचा पाठपुरावा केला व त्यातील काही प्रश्न अंशतः सोडविण्यात मला यश पण आले आहे. त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते.
मी जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा शिवसेना पक्षाच्या सहकार्याने आमदार पातळीवरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होत होता. परंतु स्वतः आमदार नसल्याने म्हणावे तसे बळ म्हणावे अशी ताकद.. प्रश्नाचा पाठपुरावा करताना लावता येत नव्हती. म्हणून हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी आमदार व्हावे असे जनतेला वाटत होते आणि जनता सातत्याने निवडणुकीतून माघार घेऊ नका असे सांगत होती. जिल्हा प्रमुख म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी मी सुद्धा तेवढ्याच ताकदीने पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे .शिवसेना पक्ष पुनश्च घराघरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
या मतदारसंघातील जनतेची विशेष करून महिला व युवक वर्गाची फार मोठी अपेक्षा माझ्याकडून असल्यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीमधून माघार घेऊ नये ,असा आग्रह सातत्याने होत असून तुम्हाला आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी आर्त हाक जनतेमधून पाहावयाला मिळत आहे .शिवसेना पक्षाने केलेली कारवाई मी कठोर अंतकरणाने स्वीकारलेली असून भविष्यामध्ये जर कोणता पक्ष काम करण्याची संधी देणार असेल तर त्यामध्ये प्रथम प्राधान्य हे शिवसेना पक्षालाच असेल, असेल असे शैला गोडसे यांनी स्पष्ट केले.