पंढरपूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी अखेर भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पोटनिवडणुकीतील उमेदवार भगिरथ भालके यांचे उपस्थितीमध्ये गुरुवार 8 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर कल्याणराव काळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन वर्षापूर्वी त्यांनी आपल्या कारखानदारीच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्कालीन सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. विठ्ठल परिवारातील घटक असलेल्या आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर काळे यांनी राष्ट्रवादीत यावे असा आग्रह होता. यानंतर भगिरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काळे यांच्यावर राष्ट्रवादी प्रवेशाचा कार्यकर्त्यांनमधून रेटा वाढत होता तर दुसरीकडे भाजपामधील वरिष्ठ नेते त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून मनधरणी करीत होते.
मागील आठवडाभरातील चर्चेनंतर काळे यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर येथील कोर्टी रोडवरील श्रीयश पॕलेस येथे पक्ष प्रवेश होणार आहे.