दामाजीपंतांना पावला पांडुरंग, परिचारकांच्या साथीने समाधान आवताडे पोटनिवडणुकीत विजयी
पंढरपूर , दि.2 – सार्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे हे 3 हजार 733 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांचा येथे पराभव झाला आहे. दरम्यान पंढरपूर मतदारसंघात प्रथमच भाजपाने विजय मिळविला आहे. येथील पराभव राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे. पंढरपूर शहर व परिसरातील गावांनी या निवडणुकीत आवताडे यांना साथ दिली असून यासाठी आमदार प्रशांत परिचारक व त्यांचे बंधू उमेश यांनी जोरदार व्यूहरचना आखली होती. यामुळे भागातून चांगली मतं भाजपाला मिळाली आहेत.
अत्यंत चुरशीची निवडणूक झाली असल्याचे मतमोजणीतून स्पष्ट होत आहे. रविवार 2 मे रोजी सकाळी आठ वाजता येथील शसकीय गोदामात उमतमोजणीस सुरूवात झाली होती. पहिल्या फेरीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी 350 मतांची आघाडी घेतली होती मात्र नंतर राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांनी काही फेर्यात मताधिक्क्य मिळविले होते. पंढरपूर शहरातील मतमोजणीत पुन्हा भाजपाच्या आवताडेंनी आघाडी घेतली. पंढरपूर शहर व जोडलेल्या बावीस गावांमधून समाधान आवताडे यांना एक हजाराहू अधिक मताधिक्क्य मिळाले. येथील परिचारक गटाने केलेल्या झंझावाती प्रचारामुळे आवताडे यांना पंढरपूर भागात चांगली मतं मिळाली. यानंतर मंगळवेढा भागातील मतमोजणी आवताडे व भालके यांच्यात मोठी चुरस दिसून आली. 36 व्या फेरीत आवताडे यांना 4102 मतांची आघाडी होती. यानंतर टपाली मतांची मोजणी झाली व यात समाधान आवताडे यांनी 230 चे मताधिक्क्य घेतले. शेवटच्या दोन फेर्यात राष्ट्रवादीचे भालके यांनी जास्त मतं घेतल्याने आवताडे यांचे एकूण मताधिक्क्य 3503 इतके कमी झाले होते. टपाली मतातील 230 ची आघाडी मिळून भाजपाने ही जागा 3733 मताधिक्क्याने जिंकली.
या पोटनिवडणुकीत एकूण 2 लाख 27 हजार 421 मतं मोजण्यात आली असून यात 3331 टपाली मतांचा समावेश होता. यापैकी समाधान आवताडे यांना 1 लाख 9 हजार 450 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांना 1 लाख 5 हजार 717 मतं मिळाली आहेत. टपाली मतमोजणी ही 36 व्या फेरीनंतर घेण्यात आली. यात आवताडे यांना 1676 तर भालके यांना 1446 मते मिळाली. अपक्ष शैला गोडसे यांना 25 तर सिध्देश्वर आवताडे यांना 25 टपाली मतं मिळाली.
राष्ट्रवादीचे आमदार कै. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली होत. 17 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले होते. ही जागा 2009 पासून सलग तीनवेळा भारत भालके यांनी जिंकली होती. पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव भगिरथ यांना पक्षाने उमेदवारी दिली मात्र त्यांचा येथे पराभव झाला. दरम्यान विजयी झालेले भाजपाचे समाधान आवताडे हे 2014 पासून या मतदारसंघात नशीब आजमावत आहेत. त्यांना तिसर्या निवडणुकीत विजय मिळविता आला आहे. 2014 व 2019 च्या मतांचा विचार केला तर आवताडेंची मते वाढत असल्याचे दिसत होते. या निवडणुकीत भाजपाने पंढरपूरच्या आमदार प्रशांत परिचारक यांची ताकद आवताडेंच्या पाठीशी लावली होती. ही व्यूहरचना यशस्वी ठरली व पहिल्यांदाच या मतदारसंघात भाजपाला यश मिळविता आले आहे.
ही जागा जिंकण्यासाठी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने खूप प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जागा प्रतिष्ठेची केली होती. तर भाजपाने ही तीन पक्षांच्या आघाडीला रोखण्यासाठी सारी ताकद पणाला लावली व यात त्यांना यश आल्याचे दिसत आहे. सार्या राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे होते. या निवडणुकीत पंढरपूरच्या परिचारक गटाने आवताडे यांच्या विजयासाठी खूप प्रयत्न केल्याचे दिसत होते. ही लढत आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रतिष्ठेची केली होती. यात त्यांना यश आले आहे . या निवडणुकीची जबाबदारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर देण्यावर आली होती. यासह माजी मंत्री बाळा भेगडे, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, राम सातपुते या आमदारांसह अनेकांनी येथे भाजपाच्या विजयासाठी प्रयत्न केले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे दौरे येथे झाले होते.
रविवारी येथील शासकीय गोदामात मतमोजणी दरम्यान कोविड विषय सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन गुरव यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी काम पाहिले. येथे पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम व शहर पोलीस निरीक्षक अरूण पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
उमेदवारनिहाय मिळालेली मत
समाधान आवताडे (भाजपा) 1 लाख 9 हजार 450, भगिरथ भालके (राष्ट्रवादी काँगे्रस) 1 लाख 5 हजार 717, सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) 469, शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी)1607, बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी)1196, संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी) 272, राजाराम कोडिंबा भोसले (बळीराजा पार्टी) 69, सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष) 1027, अपक्ष सिताराम मारुती सोनवले 136, अभिजित वामनराव आवाडे-बिचकुले 137, सिध्देश्वर बबन आवताडे 2955, कपिल शंकर कोळी 94, सुदर्शन रायचंद खंदारे 114, नागेश प्रकाश पवार 206, बिरुदेव सुखदेव पापरे 412, संतोष महादेव माने 729, सुदर्शन पांडुरंग मसुरे 849, सुनील सुरेश गोरे 768, संदीप जनार्दन खरात 500 व कोणालाच नाही (नोटा) 599 मतं.