सोलापूर विद्यापीठाच्या ‘विशेष सुरक्षित मास्क’चे पेटेंट भारत सरकारच्या पेटेंट नियतकालिकेत प्रसिद्ध
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची माहिती
सोलापूर, दि.29- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी कोरानापासून संरक्षणासाठी विशेष मास्कची निर्मिती केली असून त्याचे पेटेंट भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाच्या नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. विद्यापीठाच्या वैभवात भर घालणारी ही बाब असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी म्हटले आहे.
कोरोना महामारीपासून संरक्षणासाठी विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलातील फंक्शल मटेरियल्स लॅबरोटरी व इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. विकास पाटील व त्यांच्या सहकारी संशोधकांनी अँटीमायक्रोबायोल नॅनो पार्टिकल संशोधन प्रयोगशाळेत तयार करून त्याचा मास्ककरिता उपयोग केलेला आहे. त्यापासून ‘अँटीमायक्रोबायोल नॅनो पार्टिकल बेस्ड फेस मास्क’ची निर्मिती करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर 1000 या विशेष सुरक्षित मास्कची निर्मिती करण्यात आलेली आहे व सदरील मास्क डॉक्टर्स, रूग्णालये, सामाजिक संस्था यांना वितरित करण्यात आले. त्याच बरोबर ते आयसीएमआर, नवी दिल्ली आणि एनआयव्ही, पुणे, मुंबई यांनाही पाठविण्यात आले. याचबरोबर त्याच्या पेटंटसाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालय, मुंबई येथे दाखल करण्यात आले. त्यासंदर्भात पेटंट कार्यालयाकडून या ‘स्पेशल मास्क’चे पेटेंट नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे.
केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितिन गडकरी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनाही मास्क भेट म्हणून देण्यात आले होते, त्यांनीही चांगला अनुभव सांगितलेला आहे. या मास्कच्या निर्मितीसाठी भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील योगेश जाधव, युवराज नवले तसेच इनक्युबेशन सेंटरमधील प्रियांका चिप्पा यांचेही सहकार्य मिळाले आहे.
*अँटीमायक्रोबायोल नॅनो मास्क*
नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या मास्कला दोन लेयर असून याचा वापर केल्यास कोरोना विषाणूपासून पूर्णतः सुरक्षित राहता येते. नॅनोपार्टिकलचे साइज 20 ते 30 नॅनोमीटर आहे. अनेक वेळा धुऊन मास्क वापरता येतो. मटेरियल कॉटन फॅब्रिक्सचे असल्याने श्वास घ्यायला अडचण होत नाही व जिना चढताना धाप लागत नाही, असा संशोधनाचा निष्कर्ष निघाला आहे व वापरकर्त्यांनीही अनुभव सांगितलेले आहे. अल्पदर ना नफा ना तोटा या तत्त्वावर निर्मिती झालेली आहे. आकर्षक रंगसंगतीचा वापर केलेला आहे. इको फ्रेंडली व ग्रीन केमिस्ट्रीचा वापर करून तयार करण्यात आलेला मास्क सर्वांना आवडणारा ठरला आहे. मास्कच्या अधिक माहितीसाठी योगेश जाधव (9022109461) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि प्रा. डॉ. विकास पाटील यांनी केले आहे.