अहिल्यादेवींनी जिल्ह्यात केलेल्या वास्तु, शिल्प, वाडा, बारवा यांच्या जीर्णोद्धारांचा विद्यापीठाकडून होणार अभ्यास
जयंती विशेष; कुलगुरू डॉ. फडणवीस यांची माहिती
सोलापूर, – एक कर्तृत्ववान उत्तम प्रशासक, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. अहिल्यादेवी एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या. संपूर्ण देशभरात त्यांचे महान कार्य अजरामर आहे. अहिल्यादेवी यांनी सोलापूर जिल्ह्यात निर्माण केलेल्या वास्तू , शिल्प, वाडा, बारवा, मंदिरे जीर्णोद्धारांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्यानंतर विद्यापीठात अहिल्यादेवी यांच्या नावाने अध्यासन केंद्राची निर्मिती होत आहे. अध्यासन केंद्र अंतर्गत अहिल्यादेवी यांच्या जीवनकार्यावर संशोधन व अभ्यास होणार आहे. यामुळे नव्या पिढीला अहिल्यादेवींचे आदर्श महान कार्य समजणार आहे आणि त्यातून त्यांना एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. याचबरोबर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवी यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार आहे. याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी सोलापूर जिल्ह्यात विशेषतः मंगळवेढा, सांगोला या भागात निर्मिती केलेल्या वास्तू , शिल्प, वाडा, बारवा, मंदिरे जीर्णोद्धारांचा अभ्यास व संशोधन केले जाणार आहे. पुरातत्वशास्त्र विभागप्रमुख डॉ. माया पाटील आणि इतर तज्ञ संशोधकांकडून याचा अभ्यास होणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.
कठीण काळात अहिल्यादेवी होळकर यांनी संकटांचा सामना करत खूप मोठे महान कार्य केले आहे. अशा या महान राज्यकर्त्या असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांची उद्या (31 मे) रोजी जयंती आहे. यानिमित्त विद्यापीठात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजिला आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्यादेवींचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.
अहिल्यादेवी यांनी राज्यकारभार पाहत असताना आपली राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशी दिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.
महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. अहिल्यादेवी यांनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील, अशी पेठ कायम केली. सोलापूरदेखील वस्त्रोद्योग नगरी म्हणून परिचित आहे. यामुळेच विद्यापीठाकडून हॅण्डलूम युनिटची निर्मिती करून त्यासंदर्भात अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. विविध प्रकारचे हँडलूम प्रोडक्ट्सची निर्मिती सध्या सुरू आहे. याचाच आणखीन विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू असून ‘एमएसएमई’कडून देखील मदत घेण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. विद्यापीठाकडून निर्मिती होत असलेल्या अध्यासन केंद्र व स्मारक येथे अहिल्यादेवी यांचे शिल्प, लँडस्केपमधून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला जाणार आहे.