उद्या आरक्षणप्रश्नी भाजपाचे चक्का जाम आंदोलन
पंढरपूर- राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मराठा समाजास आरक्षण मिळाले नाही. ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले तर मागासवर्गीयांचे नोकरीमध्ये आरक्षण धोक्यात आले आहे. याच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने शनिवार 26 जून रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
पंढरपूर शहरामध्ये विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक व मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. या राज्य सरकारने मराठा समाजाची बाजू व्यवस्थित न मांडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण रद्द झाले. तर राज्यातील ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकातील आरक्षण ही रद्द झाले. यामुळे 12 बलुतेदार 18 पगड जमातीचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नेतृत्व संपुष्टात येणार आहे. मागासवर्गीचे नोकरीतील पद्दोन्नती आरक्षण ही रद्द करण्यात आले आहे. या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी व राज्य सरकारला जागे करण्यासाठी पंढरपूरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा.सुभाष मस्के यांनी दिली.