पंढरपूर- राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूरहून पुण्याकडे जाणार्या बसेसमध्ये अहिल्यादेवी चौकातून (संत गजानन महाराज मठाजवळ) प्रवासी घेण्यास बुधवार 30 जूनपासून सुरुवात झाल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक शशिकांत हरिदास यांनी दिली.
पंढरपूर बसस्थानक शहर व उपनगरातील नागरिकांना लांब होत असल्याने अनेकदा तिथवर जाणे अडचणीचे होते, त्यासाठी परिवहन महामंडळाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून लिंक रोडपर्यंत विविध थांबे घेवून प्रवासी घ्यावेत अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने आगार प्रमुख सुधीर सुतार यांच्याकडे समक्ष भेटून केली होती. पंढरपूर आगाराने प्रवाशांची अडचण, मागणी लक्षात घेऊन पुण्यासाठी सुटणार्या काही बसेस अहिल्यादेवी चौकापासून (संत गजानन महाराज मठाजवळ) सोडण्याचे नियोजन केले असून त्या परतीच्या प्रवासातही या चौकापर्यंत येतील.
पंढरपूर- पुणे शिवशाही सकाळी 6 वा., 9 ,11 वाजता व विठाई सकाळी 7, 8, 10 वा. या बसेस आगारातून निघून डॉ. आंबेडकर चौक, बजाज रक्तपेढी, भक्त निवास, अहिल्यादेवी चौक येथून सावरकर पथ (स्टेशन रोड) कराड नाका, ठाकरे चौक, कॉलेज चौक मार्गे पुण्याकडे जातील.
पुण्याहून येथे येणार्या शिवशाही दुपारी 3 वा. व सायंकाळी 5 वा तर विठाई दु.2 वा., 4 व सायं.6 वा. यिा बसेस कॉलेज चौकापासून कराड नाका, तहसील कार्यालय मार्गे डॉ.आंबेडकर चौक, रक्तपेढी, भक्त निवास, अहिल्यादेवी चौक येथून सावरकर पथ मार्गे स्थानकावर पोहोचतील.
प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु केलेली ही बससेवा कायम चालू राहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानक प्रमुख रत्नाकर लाड, ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा कोषाध्यक्ष सुहास निकते, दीपक इरकल, नंदकुमार देशपांडे, तालुकाध्यक्ष अण्णा ऐतवाडकर यांनी केले आहे.