पंढरपूर- भीमा व नीरा खोर्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसाने तेथील प्रकल्प आता क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. जुलैच्या अखेरीस धरणांमधील पाणीसाठा हा अत्यंत समाधानकारक असून काही प्रकल्प तर आता शंभर टक्के भरले आहेत. दरम्यान अजून ही तेथे पावसाची हजेरी आहे. दरम्यान पुणे, सातार्यासह घाटमाथ्याच्या भागात पुन्हा 1 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याने 28 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पुणे व सातार्याच्या घाटमाथ्याचा समावेश आहे. या भागात पडणार्या पावसानेच भीमा व नीरा खोर्यातही पाणी येते.
भीमा उपखोर्यातील धरण वेगाने भरली आहेत यात कलमोडी व आंध्रा 100 टक्के तर चासकमान 85.65 , वडीवळे 85.16, भामा आसखेड 82.43 टक्के भरले आहे. यंदा या उपखोर्यात चांगला पाऊस नोंदला गेला आहे. याच बरोबर मुळा व मुठा खोर्यातील धरणांत वेगाने पाणीसाठा होत असून अद्यापही तेथे पावसाची हजेरी आहे. खडकवासला प्रकल्प 100 टक्के भरल्याने गुरूवारी यातून 2 हजार क्युसेक पाणी सोडले जात होते. यासह साखळी धरणातील अन्य प्रकल्पांची स्थिती पानशेत 91, वरसगाव 81 तर टेमघरमध्ये 71 टक्के पाणी आहे. या मागील साखळी धरणांवर पाऊस वाढला की खडकवासल्यात पाणी सोडले जाते व तेथून पुढे नदीत विसर्ग होवून याचा फायदा उजनीला होतो. मागील आठवड्यात सतत खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडले गेले आहे.
यासह भीमा खोर्यातील मोठे असणारे मुळशी धरण 73 तर पवना 85 टक्के भरले आहे. मुळशीच्या पर्जन्यक्षेत्रात मागील आठवड्यात सर्वाधिक पाऊस नोंदला गेला होता. कासारसाई 87 टक्के भरले आहे. घोड उपखोर्यातील धरणं ही नेहमीच ऑगस्टच्या दरम्यान होणार्या पावसाने भरतात. यंदा मात्र तेथील प्रकल्पात ही चांगला जलसाठा झाला असून येडगाव 83, डिंभे 73, वडज 57 , माणिकडोह 34, घोड 38 टक्के भरले आहे.
नीरा खोर्याला यंदा पावसाने मोठी साथ दिली असून वीर धरण 95 टक्के भरले आहे. याच बरोबर गुंजवणी 94, देवघर 93 तर भाटघरमध्ये 71 टक्के पाणीसाठा आहे. या साखळी धरणात मागील प्रकल्पातून वीरमध्ये पाणी सोडले जाते व यामुळेच वीरचे दरवाजे सतत उघडावे लागत आहेत. गुरूवारी 29 जुलै रोजी सकाळी 5 हजार क्युसेकने नीरा नदीत पाणी सोडले जात होते. येथील वीज प्रकल्प 800 क्युसेकने सुरू आहे व हे पाणी देखील नदीच येते. दरम्यान वीरच्या पाण्याने नीरा व भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे.
मागील चोवीस तासात भीमा व नीरा खोर्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागली असून यात मुळशीवर 54 तर टेमघर वर 45 मि.मी. पावसाची नोंद आहे. अन्य प्रकल्पावर ही किरकोळ व मध्यम पर्जन्यमान झाले आहे.
सध्या भीमा खोर्यातील कलमोडीतून 561, भामा 806, वडीवळे 587 , आंध्रा 722 तर खडकवासलामधून 1929 क्युसेक पाणी सोडले जात आहे.