पावसाने पाठ फिरविल्याने निरेवरील धरण व उजनीत यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा


पंढरपूर – भीमा व नीरा खोऱ्यात पावसाने ओढ दिल्याने धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ऑगस्ट महिन्यात पर्जन्यराजाने धरण परिसराकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. याचा परिणाम उजनीत 22 तर वीरमध्ये 2020 च्या तुलनेत 13 टक्के कमी जलसाठा आहे.
वीर धरणात मागील वर्षी 25 ऑगस्टला 98 टक्के पाणी होते तर यंदा येथे 85 टक्के साठा झाला आहे. नीरा साखळी धरणातील गुंजवणीत 88.41 टक्के तर भाटघरमध्ये 91.96 टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी हे दोन्ही प्रकल्प 100 टक्के होते. देवघर धरणात मात्र यंदाही मागील वर्षीप्रमाणेच 99 टक्के पाणी शिल्लक आहे.
पुणे जिल्ह्यासह भीमा खोऱ्यात पावसाने ओढ दिल्याने सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात गतवर्षीच्या तुलनेत 22 टक्के पाणीसाठा कमी असून ही चिंताजनक बाब म्हणावी लागणार आहे. 2020 मध्ये 25 ऑगस्टला सकाळी 84.85 टक्के जलसाठा उजनी धरणात साठला होता. तर यंदा 2021 ला याच तारखेला धरणात 62.44 टक्के पाणी उपयुक्त पातळीत शिल्लक आहे. भीमा खोऱ्याकडे पावसाने पाठ फिरविल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी 2020 ला झालेल्या चांगल्या पावसाने भीमा व नीरा खोऱ्यात पावसाळ्याच्या सुरूवातीलाच चांगला जलसाठा होता. यामुळे तेथील प्रकल्प सध्याही समाधानकारक स्थितीत भरले असले तरी उजनी धरण मात्र टक्केवारीत साठीच्या आसपास घुटमळत आहे. यातच सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर नसल्याने धरणातून कालव्यासह अन्य योजनांमध्ये पाणी सोडले गेले आहे. भीमा व नीरा खोऱ्यात पावसाचा अजिबात पत्ता नाही. आज केवळ वडिवळे प्रकल्पावर किरकोळ पाऊस नोंदला गेला आहे. दरम्यान उजनीत येणारी आवक ही 3 हजार 176 क्युसेक इतकी कमी आहे. जेवढे पाणी येत आहे तेवढे कालवा व अन्य योजनांमधून पुढे जात असल्याने धरणाला काहीही फायदा नाही. उजनीत एकूण पाणीसाठा हा 97.11 टीएमसी इतका झाला असून यात उपयुक्त पाणी हे 33.45 टीएमसी आहे. या प्रकल्पावर या पावसाळा हंगामात एकूण 298 मिलीमीटर पावसाची आजवर नोंद आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!