पंंढरपूर – भीमा खोर्यात अनेक धरणांवर गेल्या दोन तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने तेथील प्रकल्प भरत आल्याने पाणी सोडण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असून भीमेवरील चासकमान धरण शंभर टक्के भरल्याने आता यातून 3 हजार 685 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. याच बरोबर पुणे बंडगार्डनचा विसर्ग ही वाढून 10 हजार क्युसेकच्या पुढे गेल्याने याचा फायदा उजनीला होणार आहे.
दौंडची आवक आता वाढत चालली असून 7410 क्युसेक पाणी उजनीत मिसळत आहे. मात्र आगामी काही तासात यात वाढ दिसून येईल. भीमा नदी परिसरात झालेला पाऊस तसेच चासकमाचे पाणी ही उजनीत येणार आहे. यामुळे दौंडची आवक वधारणार आहे. उजनी धरणात मागील चोवीस तासात एक टक्क्याहून अधिकची वाढ झाली आहे. नीरा धरणांच्या परिसरात होत असलेल्या पावसाने देवघर व भाटघर धरणांचे दरवाजे उघडले आहेत. भाटघरमधून 7 हजार क्युसेकने पाणी वीर धरणात सोडले जात आहे. तर दुसरीकडे भीमा खोर्यातील मुळा व मुठा उपखोर्यात दोन दिवसात चांगला पाऊस नोंदला गेला असल्याने खडकवासला साखळी धरणातील शंभर टक्के भरलेल्या वरसगावमधून साडेचार हजार क्युसेकने पाणी पुढे सोडले जात आहे. यास भीमा खोर्यातील कासारसाई, आंध्रा व कलमोडी प्रकल्प भरले असल्याने यातून ही नद्यांमध्ये पाणी सोडणे सुरू करण्यात आले आहे.
मागील चोवीस तासात वडीवळे 49 मि,मी., मुळशी 56, टेमघर 52, वरसगाव 31, पानशेत 31, कलमोडी 24, पवना 19 यासह अन्य प्रकल्पांवर पावसाची नोंद आहे. दरम्यान भीमा व नीरा खोर्यातील 25 पैकी सतरा धरणं ही नव्वद टक्क्याहून अधिक भरलेली आहेत. यामुळे आता तेथील मोठ्या धरणात पाणी साठविण्याची जागा नसल्याने हे भीमा खोर्यातील पावसाचे पाणी उजनीला मिळणार आहे तर नीरा खोर्यातील पावसाचे पाणी वीर भरल्यानंतर पुढे नीरा नदीत सोडावे लागणार आहे. सध्या वीर धरण 80 टक्के भरले आहे तर मागील गुंजवणी ,देवघर व भाटघर हे प्रकल्प क्षमतेने भरले आहेत.
भीमा उपखोर्यातील चासकमान, कलमोडी, आंध्रा ही धरण शंभर टक्के तर भामा 95 तर वडीवळे 92 टक्के भरले आहे. मुळा मुठा उपखोर्यातील पवना, कासारसाई, टेमघर, वरसगाव, पानशेत हे क्षमतेने भरले आहेत. तर मुळशीत 92 तर खडकवासला धरणात 94 टक्के पाणीसाठा आहे. साखळी धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने आगामी काळात खडकवासला शंभर टक्के भरताच यातून पुढे नदीत पाणी सोडले जाईल याचा थेट फायदा उजनीला होईल. या पावसाळा हंगामात खडकवासला धरणातून आजव साडेचार टीएमसी पाणी नदीत सोडून उजनीला फायदा झाला आहे. पावसाची स्थिती पाहून आता देखील कधीही खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होवू शकते. कारण मागील तीन ही धरणं शंभर टक्क्यांच्या आसपास भरली आहे व यातून पाणी पुढे सोडले जात आहे.
घोड उपखोर्यातील वडज व डिंभे हे दोन प्रकल्प नव्वद टक्क्यांच्या पुढे भरले आहेत. अन्य प्रकल्प हळूहळू वधारत आहेत.