सोलापूर जिल्ह्यात इनकमिंगमुळे महायुतीच्या जागा वाटपात मोठा तिढा
पंढरपूर– सोलापूर जिल्हा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला होता व हा पक्ष राज्यात युतीचा मोठा भाऊ असताना येथे बहुतांश मतदारसंघात धनुष्यबाणाचे उमेदवार उभे असायचे. मात्र 2014 नंतर परिस्थिती बदलली असून भारतीय जनता पक्ष येथे मजबूत झाला आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघात कमळाचे खासदार आहेत. आता 2019 च्या जागा वाटपाच्या वेळी जिल्ह्यात भाजपा शिवसेनाला अकरापैकी सात जागा देणार का? हा मोठा प्रश्न आहे. यामुळेच येथे जागा वाटपाच्या वेळी मोठा तिढा निर्माण होणार हे निश्चित आहे.2014 च्या पूर्वीच्या युतीचा विचार केला तर येथील अकरा पैकी सात जागा शिवसेनेच्या आहेत असा त्यांचा दावा आहे. अक्कलकोट,उत्तर सोलापूर , सांगोला व माळशिरस या जागा भाजपा लढवित होता तर उर्वरित जागांवर शिवसेनेचे उमेदवार असायचे. 2014 ला युती नव्हती त्यामुळे सर्वांनीच सगळ्या जागा लढविल्या होत्या. यात आता दक्षिण सोलापूरमधून सहकार मंत्री सुभाष देशमुख हे विजयी झाले असल्याने या जागेवर आपसूकच भाजपाचा दावा असणार आहे. मात्र येथील ताकदवान नेते माजी आमदार दिलीप माने यांनी काँगे्रस सोडून शिवबंधन हातावर बांधले आहे. यामुळे येथे जागा वाटपाच्या वेळी राजकीय संघर्ष अटळ मानला जात आहे. याच बरोबर लोकसभा निवडणुकीत जेथे जेथे भाजपाला जास्त मताधिक्क्य आहे त्या जागांवर ही हा पक्ष आपला हक्क दाखविणार आहे व सध्याच त्यांनी पावले त्या दिशेने सुरू आहे. येथे भाजपाचा विस्तार वाढ पाहता शिवसेनेने तानाजी सावंत यांच्याकडे या जिल्ह्याचे पालकत्व दिले व त्यांनी आक्रमकपणे येथील जागांवर आपला दावा सांगण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना व भाजपा एकदिलाने लोकसभेला लढल्याने जिल्ह्यातील सर्व जागा युतीच्या हाती आल्या आहेत. पण विधानसभेला आता परिस्थिती निराळी आहे. बार्शी, पंढरपूरसह सर्वच जागांवर शिवसेना व भाजपाचा दावा आहे. पंढरपूरमध्ये शिवसेनेने शैला गोडसे यांना ताकद दिली आहे तर बार्शीत दिलीप सोपल यांना पक्षात घेवून संभाव्य उमेदवार म्हणून घोषित केले आहे. माढ्याची जागा ही महायुतीत शिवसेनेकडे असल्याने तेथून सहाजिकच प्रा.शिवाजी सावंत हेच आपला हक्क सांगत आहेत तर दुसरीकडे भाजपाने येथून आपला उमेदवार देण्याची तयारी केली आहे. मोहिते पाटील यांच्यासह विद्यमान राष्ट्रवादी आमदार बबनराव शिंदे हे देखील उमेदवारी असेल तर कमळाला जवळ करण्यास तयार आहेत. मोहोळची जागा शिवसेनेकडे असते तेथे ही आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे नागनाथ क्षीरसागर शिवसेनेत दाखल झाले आहेत तर त्यांचे बंधू संजय हे भाजपामध्येच आहेत. दुसरीकडे करमाळ्याच्या राजकारणात ही तिढा निर्माण झाला आहे . विद्यमान आमदार नारायण पाटील हे शिवसेनेचे असले तरी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे पाटील हे भाजपाच्या वाटेत असल्याची चर्चा आहे. मोहिते पाटील व नारायण पाटील यांचे संबंध चांगले असून या मतदारसंघात मोहिते पाटील समर्थकांची मते निर्णायक ठरतात. सांगोला मतदारसंघ हा भाजपाकडे आहे व येथून पक्षाकडून राजश्री नागणे तसेच श्रीकांत देशमुख यांची निवडणूक लढविण्याची तयारी आहे तर माजी आमदार शहाजीबापू पाटील हे आपली व्यूहरचना आखत आहेत. येथील राष्ट्रवादीमधील काही बडी नेतेमंडळी शिवसेनेत दाखल होती अशी चर्चा आहे. यामुळे येथे शिवसेना ही आपला उमेदवार देवू शकते अशी स्थिती आहे.जिल्ह्यातील अकरा ही मतदारसंघात भाजपा व शिवसेनेने स्वबळाची तयारी केल्याचे चित्र आहे. जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला जात असल्याने नक्की जागा वाटपात काय होणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.