डेंग्यूच्या निदानासाठी प्रयोगशाळांना 600 रू. पेक्षा जास्त फी आकारण्यास मनाई
पंढरपूर – पंढरपूर व परिसरात डेंग्यू सदृश्य आजाराने थैमान घातले असून याच्या निदानासाठी पॅथॅलॉजी लॅब कडून बाराशे रूपयांहून अधिक फी एका तपासणीसाठी घेतली जात असल्याने रूग्णांचे नातेवाईक हैराण झाले आहे. याबाबत आमदार भारत भालके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली व यात शासन नियमानूसार सहाशे रूपये लॅब नी आकारावे असे ठरले आहे. याबाबत वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी संयुक्त पत्र काढून ते प्रत्येक लॅबला पाठविले आहे.सध्या शहरात डेंग्यू सदृश्य आजाराने ग्रस्त असणार्यांची संख्या मोठी असून यासाठी रक्त तपासणी करणार्या लॅब कडून रूग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच मुद्दा पुढे आला आहे. कालच आमदार भारत भालके यांच्यासह प्रांताधिकारी सचिन ढोले व वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली. यात शासन नियमानूसार फी न घेणार्या लॅब व डॉक्टरांवर कारवाईचे संकेत देण्यात आले होते. आज याबाबतचे पत्रच प्रत्येक लॅबला पाठविण्यात आले असून यात डेंग्यू आजाराच्या निश्चित निदानासाठी करण्यात येणार्या एनएस1 इएलआयएसए व एमएसी इएलआयएसए या चाचण्या करण्यासाठी 600 रूपयांपेक्षा जास्त फी आकारू नये अशी सूचना करण्यात आली आहे. याच बरोबर यासाठी रॅपीड डायग्नोस्टीक टेस्ट किटचा वापर करू नये असे आदेश ही देण्यात आले आहेत.