रात्रीत खेळ झाला..राज्याच्या राजकारणातील आजवरची सर्वात मोठी घडामोड
प्रशांत आराध्ये
पंढरपूर – शुक्रवारी सायंकाळी सात वाजता महाविकास आघाडीची बैठक वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये पार पडते. अनेक तास दोन्ही काँग्रेस व शिवसेना नेत्यांमध्ये मंथन होते. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येते. याचा आग्रह खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच धरतात. प्रसार माध्यमांना माहिती मिळते. शनिवारी पुन्हा बैठकांचा सपाटा लावला जाणार होता पण शुक्रवारची रात्र आणि शनिवारची पहाट या काळात अनेक घडामोडी घडल्या व पुन्हा भाजपा सत्तेत आला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी पक्षाचे विधीमंडळ नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.शिवसेनेने मुख्यमंत्रिपद अत्यंत प्रतिष्ठेचे केले होते. जवळपास एक महिना याच भोवती राजकारण फिरत होते. यातूनच निवडणूकपूर्व शिवसेना व भाजपाची युती ही तुटली तर केंद्रातून ही शिवसेनेला भाजपाने दूर केले. ज्यावेळी राज्याच्या राजकारणात भाजपाचे चाणक्य अमितभाई शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले तेंव्हाच अनेकांना काही तरी नवीन घडणार अशी शंका येत होती. मात्र तोवर दोन्ही काँग्रेस व शिवसेनेची महाविकास आघाडीची बोलणी खूप पुढे गेली होती. यातच काल उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईच्या तारांकित हॉटेलमध्ये एकत्रित ठेवण्यात आले होते. यामुळे आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात होते.मात्र एका रात्रीत सारे चित्रच बदलले. यापूर्वी राज्यात अशी अभूतपूर्व राजकीय घडामोड कधीच घडली नव्हती. रात्रीत भाजपा व अजित पवार यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर काहीच तासात राष्ट्रपती राजवट ही उठली आणि सकाळी सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजितदादा उपमुख्यमंत्री बनले. याची माहिती विरोकांना कोनाकान ही झाली नाही हे विशेष. सकाळी महाराष्ट्र उठला आणि पाहतो तर काय भाजपाच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन झाल्याची बातमी समोर आली. भाजपा समर्थकांनी जोरदार आतषबाजी सकाळपासून सुरू केली आहे.दरम्यान एका रात्रीत काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस व अजित पवार यांचे सरकार म्हणावे लागणार आहे. गेले एक महिना राज्यात कोणाचे सरकार येणार यावरच चर्चा रंगत होत्या. भाजपाला अन्य तीन पक्षांनी बाजूला ठेवले होते यामुळे बिगर भाजपा सरकार स्थापनच होणार ..असा सर्वांचाच दावा होता. मात्र राजकारणात मुरलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ज्या खेळ्या खेळल्या आहेत यामुळे सारा देशच आवाक झाला आहे. दरम्यान या सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना काहीही माहिती नव्हती अशी बातमी एका वृत्तसंस्थेने दिली आहे. यामुळे हे सरकार भाजपा व राष्ट्रवादीचे आहे की भाजपा व अजित पवार यांच्या गटाचे याबाबत संभ्रम आहे. याबाबत ही लवकरच अधिकृत माहिती बाहेर येईल.