कार्यक्रमात आहेराला फाटा देत पाहुण्यांची आरोग्य तपासणी
सोलापूर – घरी एखादा छोटासा जरी कार्यक्रम असला तरी पाहुणचार करण्यावरून नाराजी नाट्य घडते.कधी-कधी पाहुणचाराच्या कारणावरून नातीसुद्धा तुटतात. पाहुणचार करण्यावर हजारो रुपये खर्च करणारी मंडळीसुद्धा अनेकदा आपण पाहिली आहेत.मात्र सोलापुरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर- एमबीए दाम्पत्याने पाहुणचाराच्या खर्चाला फाटा देऊन आलेल्या पाहुण्यांचे ब्लड प्रेशर आणि शुगर तपासणी करून त्यांना रिपोर्ट कार्ड देत आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्याचा आगळावेगळा कार्यक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.राजस्व नगर परिसरात राहणारे विवेक आणि मनवी बारकुल असे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे.विवेक बारकुल यांचा विवाह २०१७ मध्ये झाला आहे. विवेक सॉफ्टवेअर इंजिनिअर तर पत्नी मनवी एमबीए झाल्या आहेत.घरी छोटा पाहुणा येणार असल्याने त्यांनी “चोळी”चा मोठा कार्यक्रम करून येणाऱ्या महिलांना साड्या आणि ब्लाउज पीस व अन्य भेटवस्तू देऊन पाहुणचार करण्याचा निर्णय घेतला.विवेक,मनवी,विवेक चेवडील बिभीषण आणि आई मंजुषा यांनी एकत्र बसून खर्चाचे गणित फायनल केले.त्यांनी याची माहिती औरंगाबाद येथील विवेकचे मामा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अजय माने आणि मामी बालरोगतज्ज्ञ डॉ. मेघा माने यांनी सांगितली. मात्र डॉक्टर दांपत्य असलेल्या मामा – मामींनी “चोळी”च्या कार्यक्रमात होणाऱ्या पाहुणचारावरील खर्चाला नकार देत त्याऐवजी कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्वच महिलांची ब्लड प्रेशर आणि शुगर सह वजन आदी आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला.विवेक,मनवी यांच्यासह घरच्या सर्वच मंडळींनी डॉक्टर मामा-मामींच्या निर्णयाचे हसतमुखाने स्वागत केले.दत्त चौकातील शुभराय मठात नुकत्याच झालेल्या “चोळी”च्या कार्यक्रमासाठी आलेल्या २०० पैकी १७५ महिलांची” शुगर “आणि “ब्लड प्रेशर” ची तपासणी करून जागेवरच त्यांना तपासणीचे रिपोर्ट कार्डसुद्धा हातात देण्यात आले. डॉक्टर दाम्पत्यांनी औरंगाबाद येथून येताना सर्व वैद्यकीय साहित्य आणले होते. आलेल्या महिलांनी बारकुल कुटुंबियांच्या या आरोग्याचा मूलमंत्र देण्याच्या सामाजिक उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.आनंदी वातावरणात “चोळी”चा कार्यक्रम पार पडला.”चोळी” च्या कार्यक्रमात “साडी”आहेर करून पाहुणचार करण्याला फाटा देत महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी बिभीषण बारकुल,मंजुषा बारकुल,गीता आकुडे,वर्षा विभूते,रेखा माने,सुनीता पवार,दीपा वानकर,सुनीता गव्हाणे, दिलीप बावळे, सुजाता बावळे, कमल पाटील यांच्यासह पाहुणेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी –
विशेष करून महिला कामाच्या गडबडीत आरोग्याकडे दुर्लक्ष करतात याची आपणास जाणीव आहे.एखादा आजार बळावल्यानंतरच त्यांना जाग येते.त्यामुळे आपण भाच्याच्या “चोळी”च्या कार्यक्रमात” साडी” आहेरच्या पाहुणचाराला फाटा देऊन महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी सामाजिक दायित्व जपले असल्याचे डॉक्टर अजय आणि डॉक्टर मेघा माने यांनी सांगितले.