मी पुन्हा येईन..म्हणत ते आले पण..तीन दिवसातच परतले ही.
प्रशांत आराध्ये
पंढरपूर- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन..हे वाक्य खूप गाजले होते. यामुळे विरोधक काय पण त्यांच्या महायुतीमधील शिवसेनेसारखा पक्ष ही वैतागला होता. जनादेश भाजपा व शिवसेनेला मिळाला पण शिवसेनेेने मुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरली व यामुळे फडणवीस यांचे पुन्हा परत येण्याचे म्हणजेच मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगल्यात जमा होते पण याच वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांना पाठिंबा दिला व पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले..मी पुन्हा येईन हे त्यांनी दिलेले वचन पाळले पण केवळ तीन दिवसांसाठी. 23 नोव्हेंबर 2019 ला पदावर आले आणि 26 नोव्हेंबरला तर अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांनी ही राजीनामा देण्याची घोषणा केली आणि सत्तेतून परत ही गेले.मी पुन्हा येईन..या एका वाक्याने 2019 ची निवडणूक गाजली आहे. आता पुन्हा याच्या भोवतीच राज्याच्या राजकारणातील चौफेर टोलबाजी रंगणार आहे. राष्ट्रपती राजवट राज्यात लागू झाल्यानंतर काँग्रेस आय , राष्ट्रवादी व शिवसेनेने महाविकास आघाडीच्या नावाखाली सत्ता स्थापन करण्याच्या आपल्या हालचाली तीव्र केल्या होत्या. अगदी निर्णय दृष्टीक्षेपात आला होता. 22 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा झाली व यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. शरद पवार यांनी ही याबाबत पत्रकारांना माहिती दिली. मात्र याच दिवशी रात्री तत्कालीन राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे रात्रीत राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली आणि सकाळी आठ वाजता राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. महाराष्ट्रात झोपेतून उठताच 23 रोजी राज्यात नवे सरकार स्थापन झाले होते.दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. शिवसेना व काँग्रेसला विश्वासात घेतले व आपल्या 50 हून अधिक वर्षाच्या राजकीय अनुभवांतून पुन्हा राष्ट्रवादीतील सर्वांना एकत्र आणले. अजित पवार यांच्याशी सतत चर्चा करण्यासाठी सहकार्यांना पाठविले. अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रीय राजकारणाला हा धक्का मानला जात होतो. यामुळे पवार कुटूंबात ही फूट पडल्याचे चित्र होते. काहींनी तर अजित पवार यांच्या पाठीशी शरद पवार यांचीच ताकद असल्याचा आरोप ही करण्यास सुरूवात केली होती. यामुळे मोठ्या पवारांसाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता.फडणवीस व पवार यांचे सरकार जरी स्थापन झाले होते तरी ही अजित पवार यांनी पदभार घेतला नव्हता तर दुसरीकडे त्यांच्याशी सतत राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा सुरू होती. यातच राष्ट्रवादीने गटनेते पद बदलून पवारांऐवजी जयंत पाटील यांना अधिकार दिले मात्र अजित पवार यांना पक्षातून काढले नाही. त्यांचे परतीचे मार्ग कायम ठेवले होते. अखेर अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा फडणवीस यांच्याकडे दिला. राष्ट्रवादीचा पाठिंबा आता मिळणार नाही हे समजताच फडणवीस यांनी ही आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला व त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यानंतर ते राज्यपालांकडे राजीनामा देण्यासाठी निघून गेले.