काशीपीठात होणाऱ्या शतमानोत्सवाचे पंतप्रधानांना निमंत्रण
सोलापूर : जानेवारीमध्ये वाराणसी (काशी) येथे होणाऱ्या शतमानोत्सवाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिले. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, शिवानंद हिरेमठ उपस्थित होते. यावेळी काशी जगद्गुरुंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘श्रीसिद्धान्तशिखामणी’ या ग्रँथाची गुजराती आवृत्ती व बेलपत्राचे रोप देऊन रुद्राक्षमाला अर्पण केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाकून जगद्गुरुंना प्रणाम केला. तेंव्हा जगद्गुरुंनी पंतप्रधानांना आशीर्वाद दिला. पंतप्रधान वाराणसी (काशी) येथील खासदार असल्याने त्यांनी काशीपीठातील कार्यक्रमाच्या निमंत्रणाचा स्वीकार केल्याची माहिती जगद्गुरुंनी दिली.