पंढरीत रंगले विकासकामाच्या श्रेयाचे राजकारण
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील काही रस्त्यांच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला असून विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी याबाबत सोमवारी दुपारी प्रसिध्दीपत्रक देत साधारणपणे 23 कोटी रूपये कामांच्या निधीची यादी पाठविली. तर सायंकाळी विधानसभेचे आमदार भारत भालके यांनी याच रस्त्यांची नावे असणारी साडेसतरा कोटी रूपयांच्या रस्ते कामाची माहिती प्रसिध्दीस दिली. या दोन्ही आमदारांनी ही कामे आपल्यामुळे मंजूर झाल्याचे सांगितले. दरम्यान मंगळवारी परिचारक यांच्याकडून आणखी एक पत्रक प्रसिध्दीस आले जे भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल यांनी दिले होते. ज्यात त्यांनी भालके यांच्यावर श्रेयवादाचा आरोप केला आहे. आता यानंतर आणखी पत्रकबाजी होईल असे दिसत आहे.
एका बाजूला राज्यातील भाजपा सरकार विकासकामांना दमडी ही देत नाही असे म्हणणारे आमदार भारत भालके मात्र मतदारसंघात मंजूर रस्त्यांच्या कामाचा निधी आपणच मिळविला असे सांगत आहेत. हा त्यांचा दुटप्पीपणा असून आमदार प्रशांत परिचारक यांच्या कामाचे श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल यांनी केला आहे.
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्य शासनाच्या विविध योजनामधून 23 कोटी रूपयाहून अधिक निधी खेचून आणला आहे. यासाठी त्यांनी मार्च 2018 व ऑगस्ट 2018 मध्ये शासनास रस्त्यांच्या नावांसह निधीची मागणी केली होती व त्यानंतरही मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर रस्त्यांसाठी निधी मंजूर केला. परिचारक यांनी याबाबत प्रसिध्दी पत्रकाव्दारे माहिती देताच काही तासातच भालके यांनी देखील घाईघाईने त्याच रस्त्यांची नावे टाकून आपल्या पत्रामुळेच निधी मिळाल्याची माहिती प्रसिध्दीस दिली. वास्तविक सदर रस्त्यांचा निधी मंजूर होऊन आठ दिवस झाले आहेत. परंतु प्रशांत परिचारक यांनी माहिती दिल्यावर विद्यमान लोकप्रतिनिधींना काही तासातच जाग आल्याची टीका श्रीकांत बागल यांनी केली आहे.
चांगले झाले तर माझ्यामुळे व वाईट झाले तर दुसर्यामुळे अशी दुहेरी भूमिका विधानसभेचे लोकप्रतिनिधी घेत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. यापूर्वी भाजपा सरकारने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विकासासाठी एक दमडाही दिला नाही असा आरोप भालके यांनी केला होता तर तुळशी वृंदावनाच्या लोकार्पण सोहळ्यात देखील सरकारवर अनाठायी टीका केली होती. त्याचवेळी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सडेतोड उत्तर दिले होते. परंतु पुन्हा या लोकप्रतिनिधींनी जनतेची दिलाभूल करण्यासाठी माझ्यामुळेच निधी मिळाल्याचे प्रसिध्दीस देऊन पंढरपूर मंगळवेढा नगरीतील राजकारण गढूळ केले आहे. दोन टर्म आमदारकी भोगलेल्या या लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघासाठी काय केले? याचा हिशोब जनता विचारल्या शिवाय राहणार नाही. असे ही बागल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.