कोरोना पार्श्वभूमीवर वारकर्यांनो पंढरीत येवू नका, महाराज मंडळींचे आवाहन
पंढरपूर – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून या दरम्यान येणार्या चैत्री यात्रेसाठी वारकर्यांनी पंढरपूरला न येता घरी बसूनच नामस्मरण करावे, असे आवाहन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे अध्यक्ष ह.भ.प. देवव्रत महाराज वासकर यांनी केले आहे.
याबाबत 26 रोजी एक प्रसिध्दीपत्रक देण्यात आले आहे. यात नमूद करण्यात आले आहे की, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 21 दिवस लॉक डाऊन पुकारण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातही त्या अगोदरच संचारबंदीचा आदेश काढला आहे. या दरम्यान 4 एप्रिल रोजी वारकरी संप्रदायातील महत्त्वाच्या चार यात्रांपैकी असणारी चैत्र शुद्ध एकादशी येत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी गेल्या काही दिवसांपासून श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर ही भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रसार हा जनसंपर्काने वाढतो. यास रोखायचे असेल तर लोकांनी एकत्रित येणे टाळले पाहिजे अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. वारकरी संप्रदाय हा सकल मानवकल्याणाचा विचार मांडणारा संप्रदाय असून आपल्या कोणत्याही कृत्याने स्वतःच्या व दुसर्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये याची खबरदारी घेणारा आहे. यामुळेच यंदाच्या चैत्री यात्रेला महाराष्ट्रातील व अन्य राज्यातील कोणत्याही दिंडीने पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवू नयेत तसेच वैयक्तिक रित्या ही वारकर्यांनी पंढरपूरला येण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन या वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य व परराज्यातील वारकर्यांची चैत्री वारी पंढरपूर मुक्कामी असणारी सर्व फडपरंपरा जपणारे, दिंडी मालक , मठाधिपती हे पंढरीरायाच्या चरणी रुजू करतील. हा कठीण काळ थोड्या दिवसांकरीता असून सर्वांनी आपापल्या ठिकाणी राहून कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी व ठायीच बैसोनी करा एकचित्त।आवडी अनंत आळवावा॥ या संतवचनांवर विश्वास ठेवून श्रीपंढरीरायाचे ,श्रीसंत ज्ञानोबाराय, श्री तुकोबाराय आदी संतांचे नामस्मरण घरी बसूनच करावे अशी कळकळीची विनंती या प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे..
या काळात वारकर्यांनी जास्तीत जास्त नामस्मरण, ज्ञानेश्वरी, गाथा, नाथ भागवत या ग्रंथांचे तसेच विशेषतः जगद्गुरू तुकोबाराय लिखित पत्रिकेच्या अभंगांचे दररोज पारायण करुन असा प्रसंग पुन्हा युगानूयुगे येऊ नये अशी प्रार्थना श्री पंढरीरायाचे चरणी करावी असे आवाहन देवव्रत उर्फ राणा महाराज वासकर, ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देहूकर, निवृत्ती महाराज नामदास, रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, भाऊसाहेब महाराज गोसावी यांनी केले आहे.