पंढरीत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मनसेकडून मास्क व सॅनिटायझरचे वितरण
पंढरपूर– कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सध्या देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. याच बरोबर या विषाणूचा प्रादुर्भाव करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अनेक विभागाचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. जीवनावश्यक सेवा सुरू आहेत. वृत्तपत्र ही जनतेची रोजची गरज बनली असून याचे वितरण करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. या वृत्तपत्रांचे वितरण करणार्या विके्रेत्या बांधवांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना या काळात मास्क व सॅनिटायझरची आवश्यकता आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांसाठी मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला व बुधवारी त्यांनी सर्व विक्रेत्यांसाठी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष महेश पटवर्धन व महादेव वाघमोडे यांच्याकडे मास्क व सॅनिटायझर सुपूर्द केले आहेत. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, गणेशराव कोले उपस्थित होते. याबाबत बोलताना धोत्रे म्हणाले की, या काळात वृत्तपत्र विक्रेत्या बांधवाना मास्क आणि सॅनिटायझर ची खूप गरज आहे. कारण त्यांना रोज वृत्तपत्र देण्यासाठी प्रत्येक वाचकाच्या घरापर्यंत जावे लागते. यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रम राबविला आहे.