रा.स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे ३ हजार कुटुंबांना 15 दिवसाचे मोफत धान्य वाटप सुरू
*सोलापूर शहरात 2700 तर जिल्ह्यातील 2300 कुटुंबांना धान्य पोहोचवणार
*जनकल्याण समितीतर्फे मदतीचे आवाहन
सोलापूर, दि. 03 एप्रिल-
कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक गोरगरिब कुटुंबांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे त्यांना अन्नधान्य मिळणे मुष्कील झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर रा.स्व. संघ जनकल्याण समिती सोलापूर जिल्ह्याच्यावतीने संघ रचनेतील सोलापूर जिल्हा म्हणजे सोलापूर शहर आणि उत्तर, दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ, बार्शी या पाच तालुक्यातील सुमारे ३ हजार कुटुंबांना १५ दिवसाचे अन्नधान्य मोफत घरपोच देण्यास सुरूवात झाली आहे.शुक्रवारी सकाळी शहर संघचालक राजेंद्र काटवे यांच्या हस्ते मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत एका कुटुंबाला धान्याचे हे कीट देण्यात आले. शिवस्मारक प्रांगणात हा कार्यक्रम झाला. त्यानंतर आता हे हे धान्याचे कीट घरोघरी वाटप करण्यास सुरूवात करण्यात आली आहे, अशी माहिती रा.स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी यांनी दिली.उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन
अधिक माहिती देताना कुलकर्णी म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि सर्व रोजगार बंद होत गेले तसे हातावर पोट असणारे हातगाडीवाले, भेळ-पाणी पुरी विकणारे, घरोघरी कामास जाणाऱ्या महिलांचे कुटुंब, झोपडपट्टी भागातील मजूर, बांधकाम मजूर, विडी कामगार यांचा रोजगार बंद होत गेला आहे. त्यामुळे हे जे मजूर ज्या ज्या भागात राहतात त्या त्या भागात एकेका स्वयंसेवकांने जावून माहिती गोळा केली. या माहितीमध्ये घरामध्ये मोटारसायकल, फोन, टी.व्ही., फ्रीज नाही आणि झोपडपट्टीमध्ये, वस्तीवर रहात आहेत, असेच ज्या घरात केवळ वृद्ध दांपत्य आहेत आणि उदर निर्वाहाचे साधन नाही अशा सर्व कुटुंबांची यादी तयार केली. विडी घरकूल, वैदू वस्ती, शहरातील विविध भागातील झोपडपट्ट्यांमध्ये एकेक स्वयंसेवकाने जावून हे सर्वेक्षण केले. या सर्व कामाबाबत उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून त्यांच्याकडून आलेल्या सूचनानुसार सर्व कामकाज चालू केले. त्यानंतर सोलापूर शहरातून अशा सुमारे 2700 कुटुंबांची यादी तयार केली. ही सर्व माहिती संघ पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना सांगितली. त्यांच्याशी या कुटुंबांना धान्य वाटप करण्याचे नियोजन कसे आहे याबाबत सविस्तर माहिती दिली आणि त्यांनी या गोष्टीला मान्यता दिली. मान्यता देताना सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे आणि आदेशाचे पालन करण्याची अटही घातली. तसेच त्यांनी या सर्व योजनेसाठी मार्गदर्शनही केले आणि काही मौलिक सूचनाही केल्या. त्यांच्या मार्गदर्शनानुसार रा.स्व. संघाच्या मोजक्या स्वयंसेवकांची रचना लावून कामकाजास सुरूवात केली.
किटमधील वस्तू
एका किटमध्ये 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 1 किलो तूर दाळ, एक किलो गोडेतेल, 1 किलो साखर, पाव किलो चहा असे सर्व साहित्य आहे. हे सर्व साहित्य गोळा करण्यासाठी अनेकांनी आर्थिक स्वरूपात मदत केली आहेच. त्याचबरोबर काही आडत व्यापाऱ्यानीही प्रत्यक्ष धान्य रूपाने मदत केली आहे.
कुटुंबे शोधण्यास संघ कार्याचा उपयोग
रा.स्व. संघाचे कार्य केवळ आपत्तीच्या वेळेसच चालू असते असे नाही. सातत्याने विविध उपक्रम असतात. हे उपक्रम सर्व जातींमधील नागरिकांसाठी सुरू असतात. त्यातून रा.स्व. संघ स्वयंसेवकांचा आपापल्या नगरातील बहुतांश वस्तींमधून संपर्क असतो. असा संपर्क असल्या कारणानेच अगदी कमी वेळामध्ये प्रत्येक नगरातील स्वयंसेवकांना आपल्या नगरातील गरजू कुटुंबांची थोडीफार का होईना माहिती असते. त्यामुळे अतिशय कमी वेळात गरजू कुटुंबांची यादी तयार झाली.
एका किटचा खर्च साधारणपणे 700 रूपये; मदतीचे आवाहन
रा.स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे गोरगरिबांना हे जे किट दिले जात आहे त्याच्या एका किटचा खर्च साधारणपणे 700 रूपये येत आहे. 1 हजार किट बनविण्यासाठी 7 लाख या प्रमाणे हिशोब केला 5 हजार किटचा खर्च सुमारे 35 लाखापर्यंत जात आहे. तरी नागरिकांनी रा.स्व. जनकल्याण समितीने हे जे कार्य आरंभिले आहे त्याला नागरिकांनी आर्थिक रूपाने अथवा वस्तू रूपाने मदत करावी, असे आवाहनही जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी यांनी केले आहे. नागरिकांनी आपली मदत रा.स्व. संघ जनकल्याण समिती पुणे, खाते क्रमांक 5870012000015791, सोलापूर जनता सहकारी बॅंक लि., नवी पेठ, आयएफएससी कोड- एसजेएसबी0000099 या क्रमांकावर जमा करावी अथवा अधिक माहितीसाठी रा.स्व. संघ जनकल्याण समितीचे कार्यवाह महेश पात्रुडकर (9850890149) अथवा संतोष कुलकर्णी (9823353953) यांच्याशी संपर्क साधावा.