कोरोना महामारी थोपविण्यासाठी ‘आम्ही सर्व एक’ ही भावना जागवू : धर्माचार्यांचे आवाहन
सोलापूर – सर्व जगामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या महामारीला थोपविण्यासाठी सर्व भारतीय जनता एक आहे हे दाखवून देण्यासाठी उद्या रविवार 5 एप्रिल रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील जनतेला रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलमधील बॅटरी लावून संपूर्ण आसमंत प्रकाशित करून सर्व भारतीयांची एकी दाखविण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनानुसार संपूर्ण देशातील जनतेने आपल्या घराच्या गॅलरीत, अंगणात दिवे प्रज्वलित करावेत आणि पंतप्रधानांच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाराष्ट्रातील धर्माचार्यांनी केले आहे.
सर्व जगामध्ये (कोविड 19) कोरोना नावाच्या महामारीने थैमान घातले आहे. साऱ्या पृथ्वीला गवसणी घालू पाहाणाऱ्या चीन, अमेरिका, जर्मनी, इटली सारख्या मी..मी.. म्हणणाऱ्या आणि प्रगत देशांमध्ये या महामारीने मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. भारतामध्ये मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता संयम आणि धैर्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. त्याचप्रमाणे पंत प्रधानांच्या आवाहनानात्मक संदेशाचे पालन करत या महामारीला थोपवून धरण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी आवाहन करत आहेत की, कोणीही घाबरून जाऊ नये. तसेच मी एकटा आहे असेही समजू नये. माझ्या बरोबर संपूर्ण देश आहे व मी देशाबरोबर आहे ही भावना अशीच ठेवा. तसेच आपण सर्वांनी दाखवलेला संयम व चिकाटीचा पुनश्च एकदा सर्व जगाला प्रत्येय येऊ द्या. त्यासाठी रविवार दिनांक 5 एप्रिल (चैत्र शुद्ध द्वादशी शके 1942) या दिवशी संध्याकाळी नऊ वाजता घरातील सर्व लाईटस बंद करा व आपापल्या घराच्या दारात किंवा बाल्कनीमध्ये येऊन दिवा, मेणबत्ती, बॅटरी टॉर्च, किंवा मोबाइल टॉर्च रात्री 9 ते 9 वा. 9 मिनिटापर्यंत (नऊ मिनिट) चालू ठेऊन या महामारीला थोपविण्यासाठी आम्ही सर्व भारतीय एक आहोत ही भावना जागवू या, असे या सर्व धर्मांचार्यांनी म्हटले आहे.
असतो मा सद्गगमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मा अमृतं गमय।। हे! विश्वनियंत्या आम्हाला असत्याकडून सत्याकडे त्याचप्रमाणे अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची शक्ती व धैर्य दे ! अशी मागणी आपण सर्व त्या परमपित्याकडे करूया, असे स्वामी गोविंददेव गिरी, ह.भ.प. काडसिद्धेश्वर महाराज (कोल्हापूर), ह.भ.प. बाळासाहेब महाराज देहूकर (प्रमुख देहूकर फड, पंढरपूर), ह.भ.प. प्रज्ञाचक्षू महाराज मुकुंदकाका जाठदेवळेकर (नगर), ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर (पंढरपूर), स्वामी रामगिरी महाराज (श्री क्षेत्र सरलाबेट, नगर), ह.भ.प. संदीपान महाराज हसेगावकर (अध्यक्ष श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी), ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ (अध्यक्ष वारकरी महामंडळ महाराष्ट्र), ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे (विश्वस्थ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर), ह.भ.प. संजय नाना धोंडगे (विश्वस्थ श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान), ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण (सोलापूर), ह.भ.प. सुंदरगिरी महाराज (पुसेगाव, सातारा), नांदगिरी महाराज (सोळशी, सातारा), माधवदास महाराज राठी (नाशिक) आदींनी म्हटले आहे.