३ मे नंतर लॉकडाऊनबाबत जिल्ह्यांची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार – मुख्यमंत्री

मुंबई, दि. २६: ३ मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरंसमध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो पुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकूत असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ते आज दुपारी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला अक्षयतृतीयेच्या, मुस्लिम बांधवांना रमझानच्या शुभेच्छा दिल्या. महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने त्यांनी अभिवादन ही केले.

कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात २० एप्रिल -नंतर शासनाने काही व्यवहार सुरु करण्याला अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वसतूंची वाहतूक सुरुच आहे. कापुस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. फळवाहतूक सुरु आहे. फळे घरपोच देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत पण काही जिल्ह्यांमधील परिस्थितीचा अभ्यास करून तिथे ३ मे नंतर काही मोकळीक देता येईल का याचा निर्णय नंतर घेण्यात येईल.

*घरातच प्रार्थना करण्याचे आवाहन*

राज्यात सर्व धर्मियांनी देशकर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेला प्राधान्य दिले असून सगळे सण घरीच साधेपणाने साजरे केले आहेत, याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना रमझानच्या काळात रस्त्यावर, मशिदीत एकत्र प्रार्थना (नमाज) न करता ती घरातल्या घरात करण्याचे आवाहन केले.

आजच्या परिस्थितीत संयम हीच आपली शक्ती आहे तर आपल्या स्वास्थ्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी,सफाई कामगार पोलीस हेच आपले देव आहेत, त्यांचा आदर ठेवणे हीच आपल्यासाठी देवभक्ती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

*नितीन गडकरी यांना धन्यवाद*

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणतेही राजकारण न करता महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणयाचे आवाहन केले होते त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री. गडकरी यांना धन्यवाद दिले. इतर राज्यातील कामगार-मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत, लॉकडाऊनमुळे ट्रेन सुरु होणार नसल्या तरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानंतर आणि मान्यतेनंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरुप पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.

*मदतीच्या हातांचे आभार*

मुख्यमंत्र्यानी टाटा, रिलायन्स, विप्रो, महेंद्र ॲण्ड महेंद्र, बिर्ला, या आणि यासारख्या मोठ्या उद्योजकांनी आपली प्रतिष्ठा बाजूला ठेऊन राज्याला खुप मदत केल्याचा आवर्जुन उल्लेख केला व त्या सर्वांना धन्यवाद दिले. राज्यातील काही विद्यार्थी राजस्थान येथे कोट्यात अडकले आहेत त्यांना ही आणण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

केंद्राचे पथक आठवडाभरापासून राज्यात असून त्यांना त्रयस्थपणे निरिक्षण करण्याचे तसेच उणिवा असल्यास त्या सांगण्याचे आवाहन आपण केले आहे, त्यांच्या सुचनांचे पालन करण्याच्या सूचनाही आपण प्रशासनाला दिल्या आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

*मुंबई – पुण्यातील वर्दळ परवडणारी नाही*

मुंबई आणि पुण्यात लोकांची वर्दळ परवडणारी नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले. विषाणु घातक असून आपण गाफील राहून चालणार नाही असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी ८० टक्के लोकांमध्ये विषाणुचे लक्षणे दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले. एकमेकांपासून दूर राहणे गरजेचे आहे -समाजातील अंतर वाढवणे नाही असे ही मुख्यमंत्री म्हणाले. २० टक्के लोकांमध्ये हायरिस्क रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

*लॉकडाऊनमुळे विषाणुचा गुणाकार रोखण्यात यश*

परिस्थिती कधी बदलणार, लॉकडाऊन कधी संपणार अशी विचारणा होत आहे पण लॉकडाऊनमुळेच आपण विषाणुच्या गुणाकाराचा वेग रोखण्यात यशस्वी झालो आहोत, रुग्णांची वाढ आपण नियंत्रणात ठेवली आहे अशी माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की यासंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, जगभरातील घटना घडामोडींवर लक्ष, संशोधनावर आपण लक्ष ठेऊन आहोत, यासंदर्भातील एका सुद्धा विषयाकडे आपले दुर्लक्ष नाही. जगभरात आपल्या देशाचे कौतूक होत आहे,आपल्या देशाने धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संकटाचा सामना केला आहे. सर्वांची खबरदारी, संयम अतुलनीय असल्याचे ही मुख्यमंत्री म्हणाले

*मृत पोलिसांच्या कुटुंबाना सर्व मदत*

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी तसेच उपचारांची पराकाष्ठा करण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एखादी घटना घडली तर पोलीस काय करतात असा सवाल केला जातो. परंतू आज हेच पोलीस दिवसरात्र सेवा देत आहेत, दुर्देवाने दोन पोलीसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, शासन पोलीसांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहीलच, त्यांना सर्व मदत ही देईल पण कोणावरही पटकन शंका घेऊ नका कारण पोलीस असतील, डॉक्टर, नर्सेस असतील आरोग्य कर्मचारी असतील हे सर्वजण आपल्या स्वास्थ्यासाठी अत्यंत तणावाखाली काम करत आहेत.

*आरोग्य सुविधांमध्ये वाढ*

राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आल्याच्या, रुग्णांच्या अलगीकरण आणि विलगीकरणासाठी मोठ्याप्रमाणत व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हॉटस्पॉटची तसेच कंटेनमेंट झोन्सची संख्या कमी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय पथकाने वरळी कोळी वाड्याच्या कोरोना मुक्तीच्या प्रवासाचे कौतूक केल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख ८ हजार ९७२ चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी १ लाख १ हजार१६२ लोकांचे कोरोना नमुने निगेटिव्ह आले. ३२३ जणांचा दुर्देवाने मृत्यू झाला. राज्यात प्लाझमा थेरपीला परवानगी मिळाल्याचे ते म्हणाले .

राज्यात दररोज एक लाखाहून अधिक शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. साडे पाच ते सहा लाख स्थलांतरीत मजूर आणि कामगारांची व्यवस्था निवारा केंद्राच्या माध्यमातून केली गेली आहे त्यांना एक वेळेसचा नाश्ता आणि दोन वेळेसचे जेवण आपण देत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

*कोरोना झाला म्हणजे गेला असं अजिबात नाही*

कोरोना झाला म्हणजे गेला असे अजिबात नाही. ६ महिन्याच्या बाळापासून ८० वर्षांच्या लोकांपर्यंत रुग्ण कोरोना मुक्त होत आहेत. त्यामुळे लक्षणे दिसल्याबरोबर घरीच उपचार न करता फिव्हर रुग्णालयात दाखल व्हा, अंगावर दुखणे काढू नका अशी कळकळीची विनंती ही मुख्यमंत्र्यांनी केली. नॉन कोविड रुग्णांसाठी खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु करावेत, शासन त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करील असेही मुख्यमंत्री म्हणाले.
….

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!