डॉक्टरांनी खासगी दवाखाने ताबडतोब सुरू करावेत – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचे आवाहन
पुणे दि.27 : – सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही बहुतांशी डॉक्टरांनी अद्याप क्लिनीक सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा त्यांनी त्वरित हॉस्पिटल सुरू करून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद करण्यात आले असले तरी क्लिनीकला यातून सूट देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे स्पष्ट करून डॉ. म्हैसेकर म्हणाले की, ज्या डॉक्टरांचे वय जास्त आहे आणि त्यांना कुठला दुर्धर विकार असेल तर त्यांनी क्लिनीक सुरू केले नाही तरी चालेल, मात्र जे डॉक्टर तंदुरूस्त आहेत मात्र अद्याप त्यांनी दवाखाने सुरू केले नाहीत, ही गंभीर बाब आहे. कोविड व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत, त्यांना सेवा देणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने बंद रुग्णालयाची माहिती घ्यावी, म्हणजे प्रशासन कार्यवाहीबाबत निर्णय घेईल. कोविडकडे लक्ष देत असताना, अन्य आजाराकडे दुर्लक्ष होता कामा नये, टेली मेडिसीनच्या माध्यमातून डॉक्टरांनी रुग्णांशी संपर्क ठेवावा, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.
0000000