पंढरपूर उपविभागातील ८० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी
पंढरपूर ,दि.29- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जनतेच्या संरक्षणासाठी पोलीस दल सतर्कपणे कर्तव्यावर आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर उपविभागातील 50 पेक्षा अधिक वय असणाऱ्या सुमारे 80 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग शहराबरोबच ग्रामीण भागातही शिरकाव होऊ लागल्याने. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार पंढरपूर उपविभागातील पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका पोलीस, पंढरपूर ग्रामीण तसेच करकंब पोलीस स्टेशन येथील 80 अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, साखरेची पातळी, थर्मल स्क्रिनिंग, छातीचा एक्सरे, रक्त आदी तपासणी जनकल्याण हॉस्पटील येथे करण्यात आल्या असल्याचेही डॉ. सागर कवडे यांनी सांगितले.
पंढरपूर उपविभागातील 50 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्या नंतर आरोग्य विभागाच्या तसेच वरीष्ठांच्या सूचनेनुसार आवश्यक निर्णय घेतला जाईल. तसेच 50 पेक्षा कमी वय असणाऱ्या पोलीसांची व त्यांच्या कुटूंबियांची सुध्दा आरोग्य तपासणी करणार असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी सांगितले.
यावेळी जनकल्याण हॉस्पिटलचे डॉ. सुधीर शिनगारे, डॉ.आनंद कुलकर्णी, डॉ.जयश्री शिनगारे, डॉ.महेश लिंगे यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या तपासण्या केल्या.