कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तरुण मंडळांचे योगदान महत्त्वाचे: प्रांताधिकारी
पंढरपूर – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पंढरपूर तालुक्यात योग्य नियोजन करण्यात आले आहे. या संकटावर मात करण्यासाठी तालुक्यातील विविध तरुण मंडळे व समाजिक संस्था यांचे योगदानही महत्वाचे असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
कोरोनामुक्तीसाठी शहरातील व ग्रामीण भागातील सर्व तरुण मंडळे, व्यायाम शाळा, शैक्षणिक संस्था, गृहनिर्माण संस्था, व्यापारी मंडळ, वकील संघटना, पत्रकार संघटना आदी संघटनांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावेत. तसेच संघटनेतल्या प्रत्येक सदस्याने आपल्या स्वता:च्या घराबरोबरच इतर ठिकाणी कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. आपला परिसर, आपला प्रभाग व आपले गांव कोरोनामुक्त राहिल याबाबत प्रयत्न करावेत. कोरोनावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न हे राष्ट्रभक्तीची भावना जोपासली जाईल असेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.
शहरात व ग्रामीण भागात परराज्यातील व परजिल्ह्यातील नागरिक मोठ्याप्रमाणात येण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या परिसरातअनाधिकृतपणे येणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनास तात्काळ द्यावी. गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले यांनी आपल्या वसाहतीत आवश्यक असणारा किराणा माल, दूध, औषधे आदी जीवनावश्यक वस्तुंचा घरपोच पुरवठा होईल याबाबत योग्य नियोजन करावे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करुन वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अथवा गैरसमज न करता आजाराची कोणतेही लक्षणे आढळ्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे, आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.