माउलींच्या पालखीचे प्रस्थान, 17 दिवस पादुका आजोळघरी असणार
पुणे– कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले. आता या पादुकांचा मुक्काम सतरा दिवस आळंदीच आजोळघरी असणार आहे. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पायी पालखी सोहळे रद्द करण्यात आले असून शासनाच्या नियोजनानंतर पादुका आषाढी दशमीला वाहन अथवा हवाईमार्गे पंढरपूरला आणल्या जाणार आहेत.
प्रतिवर्षी आळंदी प्रस्थानाच्या वेळी लाखो भाविकांची मांदियाळी जमलेली असते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. कोरोना विषाणूमुळे प्रस्थानावेळी केवळ 50 जणांनाच मंदिर परिसरातच्या आत उपस्थित राहण्याची परवानगी पुण्याच्या जिल्हाधिकार्यांनी दिली होती. मंदिरात येणार्या भाविकांचे थर्मल स्क्रीनिंग करूनच आत सोडण्यात येत होते तर येथे टाळ-मृदंग, पताका आळंदी संस्थानच्या वतीने सॅनिटाइज करण्यात आल्या होत्या.शनिवारी पाचच्या दरम्यान माउलीच्या पादुकांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. यावेळी उपस्थित भाविकांनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..असा जयघोष केला. यंदा ही पादुका प्रस्थानाच्या वेळी ढगाळ वातावरण होते.
आळंदी देवस्थानच्या वतीने मानकर्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. यावेळी विश्वस्त अॅड. विकास ढगे, सोहळा प्रमुख योगेश देसाई, डॉ. अभय टिळक, बाळासाहेब आरफळकर ,बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ आरफळकर उपस्थित होते.