राज्यात क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची संख्या ६ लाख १७ हजार
मुंबई दि.१७– लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८५ हजार ०८९ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख १७ हजार व्यक्तींना कॉरंटाइन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १५ जून या कालावधीत कलम १८८ नुसार १,३०,३९६ गुन्हे नोंद झाले असून २६,८८७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ६५ लाख १९ हजार ७०१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २६६ घटना घडल्या. त्यात ८५१ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,०३,३४२ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७३० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६,१७,२४२ व्यक्ती Quarantine आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३३ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८२,३४४ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील २७ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण २८, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१, पालघर १ अशा ४२ पोलिस बांधवांना वीरगती प्राप्त झाली. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या २०४ पोलीस अधिकारी व ११९५ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्यात सध्या एकूण १३४ रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ४,४३७ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.