निरामय आयुष्य व बलशाली पिढीसाठी सोलापूर विद्यापीठात सुरू केला योगा पदविका अभ्यासक्रम
आनंदी जीवनासाठी नियमित योगा आवश्यक: कुलगुरू डॉ. फडणवीस
सोलापूर– निरामय आयुष्य जगण्यासाठी नियमित योगसाधना करणे अतिशय आवश्यक आहे. दररोज योगा व प्राणायाम केल्याने सुंदर व आनंदी आयुष्य जगता येते. यासाठीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये गेल्या वर्षापासून योगा पदविका अभ्यासक्रम सुरू केल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, धकाधकीच्या जीवनात दररोज वेळ काढून तासभर योगा केल्यास निरोगी आयुष्य जगण्यासाठी फार मोठा फायदा होतो. शरीराबरोबरच मनदेखील यामुळे तंदुरुस्त राहण्यास मदत होते. यामुळेच योगाचे महत्व ओळखून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने कौशल्य विकास केंद्राअंतर्गत योगशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू करण्यात आला. यास सोलापुरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला, असेही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
बारावी पास अथवा त्यापुढील कोणत्याही अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. सदर अभ्यासक्रम एक वर्षे कालावधीचा असून दर आठवड्यातील शनिवार आणि रविवार सकाळी सहा ते आठ व सायंकाळी सात ते आठ अशा दोन वेळेत विद्यापीठाच्या रंगभवन जवळील अभ्यासकेंद्राच्या इमारतीत वर्ग चालतात. हा अभ्यासक्रम मराठी भाषेत असून अभ्यासक्रमाची विस्तृत माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पहिली बॅच लवकरच बाहेर पडणार आहे. दुसऱ्या बॅचसाठी जुलैपासून प्रक्रिया सुरू होईल. आज विद्यापीठात योगा अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच त्यांना समाजात प्रशिक्षण घेण्यासाठी मोठी मागणी आहे.
रविवारी कार्यक्रम
जागतिक योग दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागामार्फत उद्या (रविवारी) सकाळी 7 ते 7.45 यावेळेत गुगल मीटवर योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा योगा असोसिएशनच्या अध्यक्षा स्नेहल पेंडसे आणि स्नेहा पांडव यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणार आहेत. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती समन्वयक, क्रीडा संचालक डॉ. सुरेश पवार यांनी सांगितले.