श्री विठ्ठलाचा प्रसाद घरपोच देण्याची पंढरपुरातील उद्योजकांची अनोखी संकल्पना
पंढरपूर– यंदाची आषाढी यात्रा रद्द झाल्यामुळे महाराष्ट्रभरातील भाविकांचा हिरमोड झाला आहे तथापि या भाविकांना पंढरपूरचा प्रसाद घरपोच मिळण्यासाठी पंढरपुरातील काही उद्योजकांनी एकत्रित येऊन ना नफा ना तोटा तत्त्वावर भाविकांना ” प्रसाद रुपी पंढरीची वारी ‘ पोहोचण्यासाठी अनोखी संकल्पना सुरू केली आहे .
पंढरपुरातील देशपांडे पेढेवाले ,महाप्रसाद अगरबत्ती , जव्हेरी प्रासादिक वस्तू केंद्र तसेच स्वरूप माळी या लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन कुरिअरच्या माध्यमातून होम डिलिव्हरी देण्यासाठी ‘ पंढरी प्रसाद ‘ ही ऑनलाइन लिंक सुरू केली आहे .
या माध्यमातून आता राज्यभरातील लोकांना व्हाट्सअँपद्वारे आपली मागणी नोंदवता येईल आणि पुढील सात दिवसांमध्ये पंढरपूरच्या प्रासादिक वस्तूंची घरपोच डिलिव्हरी मिळवता येईल.
यामध्ये पंढरपूरचे प्रसिद्ध असणारे हळदीचे कुंकू , सुवासिक बुक्का , केशरी अष्टगंध, गोपीचंदन , सुवासिक ओली अगरबत्ती, ओरिजनल तुळशीची माळ, काशाचे टाळ, केशरी पेढे, चुरमुरे- बत्तासे प्रसाद तसेच श्री विठ्ठलाचे फोटो फ्रेम आणि काही पुस्तके देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ना नफा ना तोटा तत्त्वावर ही विक्री करण्यात येणार असून भाविकांना फ्री डिलिव्हरी देण्यात येणार आहे .
आज विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे चे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते या वेबसाइटचे प्रकाशन झाले . भाविकांना पंढरी प्रसाद या लिंक वर किंवा 8767413813 या व्हाट्सअप क्रमांकावर अथवा pandharisanchar.com/pandhariPrasad यावर क्लिक करून नोंदणी करता येईल.
यावेळी पवन नगरहळ्ळी , नागेश हरिदास, विशाल मोरे , कपिल देशपांडे , प्रमोद क्षीरसागर , अनिरुद्ध बडवे आदी उपस्थित होते .