भगवंताचे विश्वरूपदर्शन हा अर्जुनाच्या प्रीतीचा प्रसाद
श्री क्षेत्र आळंदी दि . २३ – भगवान श्रीकृष्ण हे सर्व व्यापक आहेत . श्री ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माउलींनी भगवंताच्या विश्वरुपदर्शनाचा सुवर्णयोग घडवुन आणला आहे. भगवंतांनी अर्जुनाच्या हट्टापायी विश्वरुप दाखविले आहे. भगवंताचे विश्वरूपदर्शन हा अर्जुनाच्या प्रीतीचा प्रसाद आहे असे ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी सांगितले .
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफ एम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( मंगळवार ) अकराव्या दिवशी केज जि बीड येथील समाधान महाराज शर्मा यांनी विश्वरूपदर्शनयोग या अकराव्या अध्यायावर सुरेख निरुपण केले .
आता यावरी एकादशी l
कथा आहे दोन्ही रसीं l
येथ पार्था विश्वरुपेसीं l
होईल भेटी ll
शर्मा महाराज म्हणाले , भगवान श्रीकृष्ण चराचरामध्ये आहे. त्याला पाहण्याची आपली दृष्टी नाहे. भगवंताला पाहायचे असेल तर त्याच्या विभूतीत जावे लागेल . मी कोण आहे , कुणामुळे आहे . कोणाचा तरी आहे याविषयी चिंतन करावे लागणार आहे . विश्वरूपात भगवंताने आपल्याला दर्शन द्यावे अशी अर्जुनाची मागणी ही अकराव्या अध्यायात आणि विभुतीयोगानंतर विश्वरूपयोग दर्शन आहे. अगोदर परमात्म्याला हा स्वत:चा विशेष रूपाचं वर्णन करतात आणि तद्नंतर विश्वरूपाचं थाट भगवंताची अर्जुनाची अत्यंतिक स्थिती भगवंतास आहे हे स्पष्ट होतं.
विभुतीयोगात पांडवात मला पहायचं असेल तर मी पांडवांना धनंजय अर्जुनात मला पहा असं भगवंत सांगतात. सर्व रसाचा प्रवाह ज्ञानेश्वरी आहे पण अकराव्या विशेष रूपाने अद्भुत रसाचं वर्णन
आलं आहे.
शांतीचीया घरा I
अद्भुत आला असे पाहुनेरा II
असं वर्णन अकराव्या अध्यायात आले आहे. भगवंत अगोदरच आतुर आहेत. याला काय काय
द्यावं आणि त्यात अर्जुनाची विश्वरूप दर्शनाची मागणी ऐकताच भगवंत तयार झाले. परंतू घाईत दिव्यदृष्टी देणेच विसरून गेले. अर्जुनाला दिसत नाही असं जाणल्यास दिवदृष्टी देवून त्याला विश्वरूप दाखवलं. त्यात या सृष्टीची सर्व ब्रह्मांडाची सर्व भू ,भुर्वस्व मह , जन , तप ,सत्य लोकांचं दर्शन आणि त्यातच आतलं, सुतलं, महातल, रसातल अशी पातळासारखी लोक महामृत्यूचे भयंदर अक्राळ विक्राळ रूप त्या
स्वरूपाच्या ठायी दिसले. अर्जुनाला हे सर्व पाहून भयावह वाटले. भीती बसली व त्याने परत याचना केली. कारण ते दृश्य इतके भयावह होते की त्यात कुरूक्षेत्रासह पांडंव कौरव हे सर्व विश्वरूप गिळंकृत करत आहे. असे दृष्य त्यांनी पाहिलं. भगवंताने अर्जुनास सुचविले, तुझा शोक दूर व्हावा, मोह दूर व्हावा म्हणूनच हे प्रयोजन आहे. अर्जुना, सर्वांचा संहार करणारा मीच आहे. त्यामुळे तू यात पडू नकोस आणि युद्ध कर.
विश्वरूप हा अर्जुनावर असलेल्या प्रीतीचा प्रसाद आहे. परंतु अर्जुन या रूपाने भयत्रस्त झाला. त्याने भगवंतास परत सगुण रूप घेण्यास सांगितले. तेच सगुण
शामसुंदर रूप मला दाखव. तेच माझ्या आवडीचं आहे. परंतू विश्वरूपासारखं दुर्मिळ दर्शन घेवूनही अर्जुनाकडे परत स्थुल दर्शनाचीच आस राहिली. परंतु या
दोन्ही दर्शनात कोणतं श्रेष्ठ भगवंत अर्जुनास विचारतील, याचे पुढील अध्यायी निरूपण होईल. या कार्यक्रमाचे निवेदन ह. भ. प. स्वामीराज भिसे यांनी केले .
उद्या बुधवार दि . २४ रोजी पुणे येथील ह भ प सचिन महाराज पवार हे सायंकाळी ४ वाजता ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर श्री ज्ञानेश्वरीच्या ” भक्तीयोग ” या बाराव्या अध्यायावर निरुपण करतील .
दरम्यान आज ( मंगळवार ) पहाटे श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांची विधीवत पूजा , अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश महाराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आली . यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले . रात्री श्री गुरु बाबासाहेब आजरेकरफडाच्या वतीने कीर्तनाची सेवा तर रात्री शिरवळकरफडाच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली .