कोरोनामुळे यंदा पालखीमार्गावर केवळ आषाढीच्या आठवणीच
यंदा कोरोनामुळे आषाढी वारीही परंपरेपुरती साजरी होत आहे. मानाच्या पालख्या (संत पादुका) हवाई मार्गाने अथवा बसने एकादशीला पंढरपूरला आणण्यात येत आहेत. पायी वारी रद्द झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता भाविकांना पंढरीत येण्यासाठी मनाई आहे.
पंढरपूर – पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी राज्यासह परराज्यातूनही पायी पालखी व दिंडी सोहळे मजल, दरमजल करत पंढरपूरला येत असतात. या काळात लाखो वारकरी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून हळूहळू पंढरीच्या वाटेवर असतात. यामुळे येथील सर्वच प्रमुख रस्ते हे विठुनामाच्या गजराने दुमदुमून गेलेले आपण नेहमीच पाहतो. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पायी वारीच रद्द झाली तर पंढरीत येण्यास भाविकांना मनाई असल्याने सोलापूर जिल्हा शांत आणि सुनसान आहे.
प्रतिवर्षी याच काळात प्रमुख संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात येत पोहोचतात. त्यांचे स्वागत शासनाच्या वतीने केले जाते. याची लगबग तर असते मात्र पालखी मार्गावरील भक्तांचे आकर्षण असणारे भव्य रिंगण सोहळे याच काळात होत असतात. सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती सर्वच तालुक्यांमध्ये विविध पालख्या व पायी दिंडी सोहळ्यांचे स्वागत होते व हा जिल्हा वारकरीमय होवून गेलेले असतो. मात्र यंदा या सर्व पालखी मार्गांवर नीरव शांतता आहे आणि केवळ सर्वांत मनात वारीच्या आठवणी दाटून येताना पाहावयास मिळतात.
प्रतिवर्षी हे दिवस करमाळा, सोलापूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला, बार्शी या तालुक्यांसाठी विविध संतांच्या पालख्या व दिंड्यांच्या स्वागताचे असतात मात्र यंदा परिस्थिती खूप वेगळी आहे. आषाढी वारी ही परंपरेपुरती साजरी होत असून केवळ मानाच्या पालख्या ( संत पादुका) या पंढरीत एकादशीला आणल्या जात आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महराज पालखी सोहळे याच काळात प्रतिवर्षी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात व रिंगण सोहळ्यांना सुरूवात होते. लाखो लोक यासाठी जमतात. पुरंदावडे, खुडूस, ठाकूरबुवा समाधी, बाजीराव विहीर यासह अकलूज, माळीनगर, वाखरी येथील गोल व उभ्या रिंगण सोहळ्यांचे आकर्षण राज्यातीलच नव्हे तर देशभरातील भक्तांना असते. हे सोहळे पाहण्यासाठी परदेशी पाहुणे ही पंढरीची वाट चालत असल्याचे आजवर पाहावयास मिळाले आहे.