लक्षणे आढळल्यास तत्काळ संस्थात्मक क्वारंटाईन करण्याच्या सूचना
पंढरपूर.दि.06: तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे तत्काळ सर्वेक्षण , कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करुन त्यांची आरोग्य तपासणी करावी ज्यांच्यात काही लक्षणे आढळून आल्यास तातडीने संस्थात्मक क्वारंटाईन करा अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी संबधितांना दिल्या.
रुग्णालयांत तपासणीसाठी आलेला रुग्णांची तपासणी करताना कोरोना पार्श्वभूमीवरच त्यांची आरोग्य तपासणी करावी. यासाठी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षित करावे. त्यांना आवश्यक ते वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करावा. रुग्णालयाचे वेळोवेळी निर्जंतुकिकरण करुन घ्यावे. रुग्ग्णांमध्ये काही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ उपजिल्हा रुग्णालय व एमआयटी कोविड केअर सेंटर येथे दाखल करावे अशा सूचना प्रांताधिकारी ढोले यांनी दिल्या आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण वाढू नयेत यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, त्या परिसरातील नागरिकांची गतीने आरोग्य तपासणी करावी. कोविड रुग्णांवर उपचार करताना अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रामध्ये निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कुणालाही येथून बाहेर जाता येणार नाही अथवा बाहेरुन या ठिकाणी येता येणार नाही या बाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याचे श्री.ढोले यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्याबरोबच स्वयंशिस्त पाळणे महत्वाची आहे. शहरात विविध ठिकाणी नागरिक अनावश्यक गर्दी करताना दिसून येत आहेत. येणाऱ्या दिवसात नागरिकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. गावपातळीवर बाहेरुन आलेल्या नागरिकांची माहिती तत्काळ ग्रामस्तरीय समिती व शहरी भागात वार्डस्तरीय समिती अथवा प्रशासनास तातडीने कळवावी. सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जवळच्या दवाखाण्यात तातडीने आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.