अकलूज, दि. १६ – कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या ७ इसमांना क्वारंटाइन करण्यास आलेल्या वैद्यकीय पथकाला व पोलिसांना असहकार्य करून नातेवाईकांच्या सहाय्याने धक्काबुक्की करणाऱ्या २२ व अनोळखी ८ ते १० जणांविरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील रामायण चौक परिसरात यापूर्वी एक इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या ७ लोकांचा स्वॅब घेऊन त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यासाठी माळीनगर आरोग्यकेंद्राचे डॉ. संकल्प जाधव व त्यांचा स्टाफ घटनास्थळी गेला होता. परंतु सदर ७ व्यक्तींनी डॉक्टरांबरोबर हुज्जत घालण्यास सुरूवात केली. हातावर क्वारंटाइन शिक्का मारण्यास नकार दिला. त्यामुळे डॉ. जाधव यांनी अकलू पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
अकलूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, बाबासाहेब भातुंगडे, कर्मचारी विलास पाडुळे, अमितकुमार यादव घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदर व्यक्तींना शोधून अकलूज शहर पोलीस चौकीला आणले. येथे या व्यक्तींना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांच्या नातेवाईक व ओळखीच्या लोकांना बोलावून घेत पोलिसांबरोबर उध्दट वर्तन केले. रूग्णवाहिकेत बसण्यास व स्वॅब देण्यास नकार दिला. त्यामुळे रामायण चौक ते अकलूज शहर पोलीस चौकी दरम्यान मोठा गोंधळ उडाला. नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. सरकारी कामकाजात अडथळा आणून पोलीस, आरोग्य व्यवस्थेशी उध्दट वर्तन व धक्काबुकी केल्याबद्दल पोलीस हेड काँन्स्टेबल हरिश्चंद्र पाटील यांनी अकलूज पोलीस ठाण्यात त्या ७ जणांसह त्यांचे नातेवाईक व इतर अनोळखी ८ ते १० लोकांवर भादवि ३५३, ३४१, १४३, १४७, १४९, २६९, १८८ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१(ब), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार बाबासाहेब भातुंगडे हे करत आहेत.