दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी महायुतीकडून राज्यभर निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांना प्रती लीटर १० रु. अनुदान द्यावे या व अन्य मागण्यांसाठी सोमवारी (२० जून) राज्यभर भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदार, अन्य लोकप्रतिनिधी तसेच माजी मंत्री महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे सहभागी झाले होते.

दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदारांना देण्यात आले. रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास १ ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही महायुतीतर्फे देण्यात आला आहे. दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना व दुग्ध विकास मंत्र्यांनाही पाठविले आहे.

लॉकडाऊन मध्ये मागणी कमी झाल्याने दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडला आहे. हॉटेल व अन्य व्यावसायिकांकडून खरेदी थांबल्याने दुधाचे भाव १६, १७ रु. पर्यंत घसरल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही, अशी स्थिती आहे. राज्य सरकारने २५ रु. लीटर प्रमाणे दूध खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र ठराविक दूध संघांकडूनच शासनाची दूध खरेदी केली जात आहे. परिणामी राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे. अशा स्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रू. अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रू. अनुदान द्यावे तसेच गाईच्या दुधाला ३० रू. दर द्यावा या मागण्यांचे निवेदन महायुतीतर्फे जिल्हाधिकारी, तहसीलदारांना देण्यात आले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!