अधिकारी-कर्मचार्यांवरील गाभाराबंंदी मागे घ्या अन्यथा 1 ऑगस्टपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
पंढरपूर, दि.21- आषाढी एकादशीनंतर 9 जुलै रोजी देवाचे सर्व नित्योपचार सुरू करण्यासाठी प्रक्षाळपूजा करण्यात आली होती. ती रूढी व परंपरेनुसारच झाली असून काही संघटनांनी मंदिरे समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या द्वेषापोटी तक्रारी केल्या आहेत. याची खातरजमा न करता समितीने संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना श्री विठ्ठल व रूक्मिणी गाभार्यात येण्यास बंदी केली आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा 1 ऑगस्ट पासून मंदिरातील सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचारी संघाने दिला आहे.
याबाबत कर्मचारी संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज राऊत यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. आषाढीनंतरच्या प्रक्षाळ पूजेदरम्यान श्री विठ्ठलाच्या गाभार्यातच समिती अधिकार्याच्या अंगावर पाणी टाकण्याचा प्रकार घडला होता. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते. याची दखल विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने गंभीरपणे घेत कालच्या बैठकीत याबाबत सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच चौकशी पूर्ण होईतोपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना देवाच्या गाभार्यात जाण्यास बंदी करण्यात आली आहे.
मंदिरे समितीचे कामकाज सुरळीत सुरू रहावे यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयात कामासाठी उपस्थित राहू शकतात असे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले होते. दरम्यान आता मंदिर कर्मचारी संघ आक्रमक झाल्याचे चित्र असून त्यांच्या म्हणण्यानुसार समितीने केलेली कारवाई ही नैसर्गिक न्यायाला धरून नाही. झालेली प्रक्षाळपूजा ही रूढी व परंपरेनुसारच पार पडली आहे. यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना जी देवाचा गाभाराबंदी करण्यात आली आहे तो निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा. अन्यथा 1 ऑगस्टपासून सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.