राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची भाजपाची मागणी, सांगोल्यात दिले निवेदन
सांगोला – कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. अशात शाळा अद्यापही सुरू झाल्या नसल्यातरी अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. कोरोनामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा असून, पालकांची परिस्थिती हलाखीची व अडचणीची झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे चालू वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चालू शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. मात्र काही शाळांनी पालकांकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. गरीब कुटुंबांना त्यांच्या विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क भरणेही कठीण होणार आहे. या त्रासापासून सर्वच कुटुंबांना दिलासा देण्यासाठी खासगी अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित अशा सर्व शाळांचे आणि पदवीपर्यंतच्या सर्व शाखांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे शूल्क पूर्णत: माफ करण्याचे आदेश सबंधित सर्व खासगी शाळा-महाविद्यालयीन संस्थाचालक आणि व्यवस्थापनाला देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात येऊन तसे आदेश त्वरीत संबंधितांना देण्याची मागणी भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रति शालेय शिक्षणमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना पाठवल्या आहेत.
तहसीलदार योगेश खरमाटे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जि.प.सदस्य अतुल पवार,गजानन भाकरे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अमरसिंह शेंडे, माढा तालुका सरचिटणीस
योगेश बोबडे, नगरसेवक आनंदा माने, गिरीश ताबे, दत्ता टापरे, आनंद फाटे, डॉ. मानस कमलापूरकर, उमेश मंडले आदी उपस्थित होते.