स्वेरीच्या अध्यक्षपदी नामदेव कागदे तर उपाध्यक्षपदी अशोक भोसले यांची निवड
पंढरपूर -राज्यातील शैक्षणिक विश्वात विशेष कौशल्य दाखवत नवनवीन प्रयोग करून लक्ष वेधून घेत असलेल्या गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इंस्टिट्यूट या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी नामदेव सावळाराम कागदे यांची तर उपाध्यक्षपदी अशोक लक्ष्मण भोसले यांची निवड एकमताने करण्यात आली.
गोपाळपूरमधील श्री. विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इंस्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये झालेल्या साधारण बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष प्रा.सी. बी. नाडगौडा यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष कागदे यांचा तर मावळते उपाध्यक्ष आर.बी. रिसवडकर यांच्या हस्ते अशोक भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
गोपाळपूरच्या ओसाड माळरानावर सन 1998 साली स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना झाली. या संस्था संचलित पदवी अभियांत्रिकी (डिग्री इंजिनिअरिंग), पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा इंजिनिअरिंग), पदवी औषध निर्माण शास्त्र (बी.फार्मसी), पदविका औषध निर्माण शास्त्र (डी.फार्मसी) तसेच एमबीए. व पीएचडी पर्यंतची महाविद्यालये सुरळीतपणे सुरु आहेत. तेव्हापासून स्वेरीच्या पंधरा विश्वस्थांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात सातत्याने ‘पंढरपूर पॅटर्न’च्या माध्यमातून नवीन प्रयोग करत असताना यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली आणि अजूनही घोडदौड सुरूच आहे आणि याच यशस्वी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड आज करण्यात आली. आज नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी पदभार हाती घेतला. अध्यक्ष नामदेव कागदे हे बांधकाम क्षेत्रात प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम पहात आहेत तर उपाध्यक्ष अशोक भोसले हे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभागातून नुकतेच निवृत्त झाले आहेत. या सत्कार प्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते.