स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचे भीमेत विसर्जन
पंढरपूर– स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्यामुळे संतप्त झालेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी नारळी पौर्णिमे दिवशी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचे चंद्रभागा नदीमध्ये विसर्जन करून निषेध केला.
दोन दिवसापूर्वी महायुतीच्या वतीने दूध दरवाढी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पंढरीत येवून संत नामदेव पायरी येथे विठ्ठलाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला. दरम्यान यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांचा उल्लेख काजू शेट्टी असा करून ते भंपक असल्याची जहरी टीका केली होती. यावर राजू शेट्टी यांनी देखील खोत यांच्यावर कडाडून टीका करीत दूधदराचे आंदोलन फसल्यानेच खोत भ्रमिष्टासारखे बोलत असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान या प्रकरणावरून दोन्ही संघटनेत आरोप प्रत्यारोप होत आहेत. सोमवारी राखीपौर्णिमे दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या पात्रात सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचे विसर्जन केले .यावेळी तानाजी बागल, विजय रणदिवे, सचिन पाटील व अन्य पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.