संचारबंदीमध्ये पंढरपूरच्या नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे : पोलीस अधीक्षक मनोज पाटील
सोलापूर, दि.5: पंढरपूर तालुक्यात व शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि प्रादुर्भाव वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे, या काळात नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
नागरिकांनी विनाकारण शहरात येणे टाळावे. वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, दूध वितरण याशिवाय कोणतीही दुकाने चालू राहणार नाहीत. आपल्या आसपास, घरातील व्यक्ती आजारी असेल तर याची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी. त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट करून पॉझिटिव्ह असेल तर रूग्णाला त्वरित विलगीकरणात ठेवता येईल. शहरातील नागरिकाव्यतिरिक्त इतरांना विनाकारण प्रवेश मिळणार नाही. पंढरपूर शहरातून जाण्यास बंदी असली तरी शहराच्या बाह्य वळण रस्त्याने प्रवाशांना जाता येणार आहे. नागरिकांनी घरी असले तरी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वेळोवेळी हात धुण्यासाठी सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करण्याचे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.